Download App

बारामतीत मतदानाचा कमी टक्का, कुणाला देणार धक्का? पुतण्या अन् काकांचंं वाढलं टेन्शन

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण ५६.९७ टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात काहीशी घट झाली आहे. २

Baramati Lok Sabha : राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ बारामती. हा मतदारसंघ तसाही चर्चेत असतो परंतु, या लोकसभा निवडणुकीत वेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची पहिलीच मोठी निवडणूक. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील सुप्त संघर्ष. यामुळे बारामतीतील निवडणूक वेगळ्याच वळणावर गेली. उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला. त्यानंतर 7 मे रोजी मतदानही झालं. पण अपेक्षेइतकं नव्हतं. त्यामुळे काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांची गणितं बिघडली आहेत. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला धक्का देणार आणि कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर ४ जूनलाच मिळेल.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण ५६.९७ टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात काहीशी घट झाली आहे. २०१९ मध्ये ६१.७० टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे मतदानातील ही पाच टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

खडकवासल्यात अजितदादांचं गणित फेल ?

खडकवासला भाजपाचा बालेकिल्ला. या विधानसभा मतदारसंघात भाजपला मानणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल मैदानात होत्या. त्यावेळी या मतदारसंघात त्यांनी ७० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती. पण, सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या जोरावर ही आघाडी कापून काढली. त्यामुळे यंदा अजितदादांची भिस्त खडकवासल्यावर होती. पण येथे झालेलं ५० टक्क्यांच्या मतदानाने अजितदादांची धाकधूक वाढली आहे.

बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार?

कमळ चिन्हाचा उमेदवार नाही म्हणून भाजपाच्या मतदारांत फारसा उत्साह दिसला नाही. खडकवासल्यात लीड घेऊन पुढील विजयाचा मार्ग सोपा करायचा असे अजितदादांचे मनसुबे होते. परंतु, त्यावर कमी मतदानाने मोठं प्रश्नचिन्ह लावलं आहे. भोर, इंदापूर, पुरंदर, दौंडमध्ये सुळेंनी दहा ते बारा हजार मतांचं लीड मिळवलंच तर खडकवासल्यातील मतांच्या आधारे हे लीड कमी करायचं असे गणित अजित पवारांनी केले होते. पण, कमी मतदानाने हे गणितही बिघडल्याची चर्चा आहे. खडकवासल्यात ६० टक्के मतदान झालं असतं तर अजितदादांना फार चिंता नव्हती. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही.

इंदापुरात महायुतीला ‘फिलगुड’

इंदापूरचा विचार केला तर येथे महायुतीसाठी फिल गुड वातावरण आहे. अजित पवार गटाचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. तसेच येथील माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही अजितदादांबरोबरील मतभेद बाजूला ठेवत प्रामाणिकपणे काम केले. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाकडे इंदापुरात सक्षम नेताच नसल्याचे येथील लढाई एकतर्फी ठरण्याची शक्यता दिसत आहे. या पॉलिटिकल परिस्थितीचा फायदा सुनेत्रा पवारांना होईल. इंदापुरात यंदा ६२.५० टक्के मतदान झालं आहे.

‘बाळासाहेब थोरात भाजपात येणार होते, आले तर स्वागतच’; मंत्री विखेंचा खळबळजनक दावा

दौंडमध्ये महायुती तर भोरमध्ये आघाडीला धक्का

दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल आहेत. पण या ठिकाणी किती लीड मिळेल याबाबत साशंकताच आहे. कारण या मतदारसंघात भाजपाचा आमदार असला तरी त्यांचं ऐकणारा मतदार येथे फारसा नाही अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला भोरमध्ये धक्का बसण्याची चिन्ह आहेत. येथे सुळेंना लीड मिळेल अशी अपेक्षा होती. पण इथलं मतदान ५०-५० राहिल्याचं सांगितलं जात आहे. खडकवासल्यात जसं अजितदादांचं गणित बिघडलं तशीच परिस्थिती सुप्रिया सुळेंना भोरमध्ये जाणवत आहे.

पुरंदरचं गणित सुप्रिया सुळेंना तारणार?

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका घेतली होती. थेट अपक्ष उमेदवारी करण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. परंतु, नंतर शिवतारेंनी माघार घेतली. निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारही केला. पण, येथे मोठी अडचण अशी आहे की शिवतारेंना मानणारे कार्यकर्ते अजितदादांना मानणारे नाहीत. त्यामुळे येथील राजकीय परिस्थिती अजितदादांना धक्का देणारीच ठरेल. पुरंदरमध्ये फक्त ४१.१ टक्के मतदान झालं आहे. येथील दिग्गज काँग्रेस नेते संजय जगताप यांनी मात्र आघाडी धर्माचे पालन करत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. त्यामुळे या मतदारसंघात सुळेंना आघाडी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे.

 

follow us