Pune News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या अन् तितक्याच प्रतिष्ठेच्या लढती पुणे जिल्ह्यात (Pune News) होणार आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत पडलेली फूट. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचं पारडं जड राहिलं. अजित पवारांना मात्र धक्क्यांवर धक्के बसले. आता याच राजकीय संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पहायला मिळणार आहे. यासाठी दोन्ही गटांकडून उमेदवारांची काळजीपूर्वक निवड केली जात आहे.
पुणे शहरातील बहुचर्चित वडगाव शेरी या मतदारंसघातून अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनाच पुन्हा तिकीट दिलं तर शरद पवार गटाने माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर विश्वास दाखवला. आता या मतदारसंघात तुल्यबळ लढत होणा आहे. उमेदवारी जाहीर होताच बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांचे आभार मानले. कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
Sunil Tingre : अखेर सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीक काय करणार याची उत्सुकता
पठारे म्हणाले, मागील 30 ते 35 वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकाजाची पद्धत पाहून माझ्यावर विश्वास ठेऊन पवार साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली. मतदारसंघातील विकास आणि वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी आता आम्हाला काम करायचं आहे. महायुती कुणाला तिकीट देईल मला माहिती नाही. पण समोर कुणीही उमेदवार असला तरी यावेळी बापूसाहेब पठारेंनाच निवडून द्यायचं असं जनतेनं ठरवलं आहे.
तिकीट मिळवण्यात तुम्हीच बाजी मारली असे विचारले असता पठारे म्हणाले, पक्षाने तरुण चेहऱ्यांना संधी द्यायचं ठरवलं होतं तरीही कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही उमेदवारी मागा. परंतु माझा तीस ते पस्तीस वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकजाची पद्धत पाहून पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला.
आता माझे मुद्दे विकासाचेच राहणार आहेत. नगर रोडवरील वाहतुकीचा प्रश्न, वडगाव शेरी भागातील वारजे-खराडी रस्ता अपूर्ण राहिला आहे तो रस्ता पूर्ण करून घ्यायचा आहे. विमाननगर ते मुंढवा हा एक महत्वाचा रस्ता असून त्याचेही काम करायचे आहे. नगर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी दोन डीपी रोड आणि एक रिंगरोड तयार करायचे आहेत. यानंतर आमच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे. लोहगावच्या पाणी, ड्रेनेज आणि रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा आहे असे सांगत बापूसाहेब पठारेंनी रोडमॅपही सांगितला.
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडमध्ये टाकला डाव; अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला?
बापूसाहेब पठारे यांच्या राजकारणाची सुरुवात खराडीच्या सरपंच पदापासून झाली. नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि नंतरच्या काळात महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. २००९ मधील विधासभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून बापूसाहेब पठारे निवडून आले होते.
यानंतरच्या काळात पठारे राजकारणापासून दूर गेले होते. राष्ट्रवादीतून बाहेर पडत भारतीय जनता पक्षातही त्यांनी प्रवेश केला होता. परंतु, येथे फार काळ रमले नाहीत. पुन्हा स्वगृही परतले. आता शरद पवार गटाने त्यांना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे आहेत. यानिमित्ताने या मतदारसंघातील लढतीत कोण बाजी मारणार याचं उत्तर मतमोजणीनंतरच मिळेल.