Baramati Lok Sabha 2024 : ‘अजितदादांनी बारामतीच्या विकासासाठी सातत्याने काम केलं. आज बारामतीत विकासाचं जे चित्र दिसत आहे त्यात अजितदादांचा मोलाचा वाटा आहे. बारामतीचा फैसला आजच्याच सभेने होणार आहे. या मंंचावरील नेत्यांकडं पाहिलं तर 10 ते 15 लाख मतं इथेच आहेत.. ही निवडणूक विकासाची आहे भावनेची नाही. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा, भाकरी बरोबर फिरवा. ज्यांना लेक आणि सुनात अंतर वाटतं त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या कारण, ज्यांच्या मनात मांडे त्यांना निवडणुकीत धोंडे पडणार आहेत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या या दोन्ही नेत्यांनी जोरदार बॅटिंग केली.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. यावेळी जाहीर सभा झाली. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, भाजप आमदार राहुल कुल, पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
ही निवडणूक भावकीची नाही, अजित पवारांकडून नाव न घेता विरोधकांवर टीका
शिंदे पुढे म्हणाले, आज या व्यासपीठावर जास्त मान्यवर बसले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले ते खरंच आहे. व्यासपीठावरील मान्यवर दहा ते पंधरा लाख मतं आणतील आणि सुनेत्रा पवारांना दिल्लीला पाठवतील. अजितदादा, बारामतीत यंदा परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. याआधी बारामतीकरांनी त्यांना पंधरा वर्षे निवडून दिलं पण, अब की बार सुनेत्राताई पवार. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा भाकरी बरोबर फिरवा.
ज्यांना लेकीत आणि सुनात अंतर वाटतं त्यांना मनात मांडे खाऊ द्या कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांना निवडणुकीत पडणार धोंडे अशा खोचक शब्दांत शिंदेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली. बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम अजित पवारांनी केलं. संधी आली तेव्हा अजितदादांवर अन्याय झाला. तेव्हा अजितदादांनी मोदींवर विश्वास ठेवला. पंतप्रधान मोदी एकदा म्हणाले होते की मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. पण, मोदींनी पवार साहेबांचं बोट सोडलं आणि देशाचा मोठा विकास केला. तसेच आता अजितदादांनीही शरद पवार साहेबांचं बोट सोडलं. आता बारामतीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Thane Lok Sabha : ठाण्याचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच प्रताप सरनाईकांच्या पत्रानं फुटला पेपर