Pune Lok Sabha Election : ‘माजी खासदार गिरीश बापटांना पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक अशी त्यांची कारकीर्द राहिली. विरोधी पक्षात आणि समाजात कधीही तूट येणार नाही असं त्यांचं काम होतं. हे राजकारण आताच्या विरोधकांना जमेल असं मला वाटत नाही. आजच्या या नेत्यांना कधी गाडीच्या खाली उतरलेलं पुणेकरांनी पाहिलेलं नाही. त्यामुळे बापट साहेब आणि त्यांच्या कामांची बरोबरी कधी होऊ शकत नाही. आता जरी ते बापट यांचं नाव घेत असतील तरी त्यांनी (मुरलीधर मोहोळ) बापटांना किती छळलं? त्यांचं कार्यालय किती वेळा फोडलं? त्यांच्या कार्यकाळात किती सहकार्य केलं? हे पुणेकरांनी पाहिलं आहे. फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेण्याचं काम केलं जात आहे’, अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर केली.
पुण्यात निष्ठेची हत्या.. रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीवरुन ‘आबां’चं नाराजी नाट्य
रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. शरद पवार यांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्यांसंदर्भात मार्गदर्शन घेतलं. शरद पवार यांची पुण्यात सभा होणार असल्याचे धंगेकर यावेळी म्हणाले.
या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार प्रहार केले. ते पुढे म्हणाले, मुरलीधर मोहोळांनी किती पैलवानांना अर्धा लिटर दूध पाजलं याचा हिशोब आधी त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना दूध पाजलं. गरीब पैलवानांना कधी अर्धा लिटर दूध त्यांनी दिलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जरी पैलवान असले तरी आमच्याकडे वस्ताद आहेत. आम्ही वस्तादांबरोबर आहोत आणि पैलवान आमचे आहेत, असा इशारा धंगेकर यांनी दिला.
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. आज शहराध्यक्ष दिसत नाहीत. तुमच्याविरोधात आंदोलनेही झाली असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर धंगेकर म्हणाले, काल मी शहराध्यक्षांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीचं नियोजनही सांगितलं. आता आमची एक बैठक होईल. काल जरी आबा बागुल यांनी आंदोलन केलं असलं तरी त्यांचा स्वभाव रागीट आहे. चाळीस वर्षे त्यांनी समाजात काम केलं आहे. आता उद्यापासून ते तुम्हाला सगळ्यात पुढं दिसतील, असे सूचक वक्तव्य धंगेकरांनी केले.
धंगेकरांनी निवडणुकीपूर्वीच जिंकला पहिला डाव; शिंदे-फडणवीस अन् अजितदादांवरही पडले भारी!