Ajit Pawar Praises PM Modi : ‘मी माझ्या जीवनात अनेक राजकीय लोकं पाहिली पण, दहा वर्षांचा काळात एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान मोदींसारखा दुसरा नेता पाहिला नाही. जगात भारताची शान वाढविण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. एक काळ असा होता की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. परंतु, नंतर असा काही करिश्मा मोदी साहेबांनी दाखवला की त्याच अमेरिकेने त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकलं. आताही जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून कुणाची ओळख असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांची आहे. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात ती एक दैवी देणगी असते. दैवी शक्ती असते’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) भाजप नेत्यांना मागे टाकील असे भाषण ठोकले.
महायुतीचे पुणे, शिरुर, बारामती लोकसभा क्लस्टरचे प्रमुख मंत्री चंद्रकांत पाटील आणि महायुतीतील सर्व सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खडकवासला विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न थकता कौतुक केले.
जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘मविआ’ची आज मेगा बैठक; मनसेही करणार प्लॅनिंग
पंतप्रधान मोदींना दैवी शक्ती
अजित पवार पुढे म्हणाले, आधी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. पण काळाबरोबर राजकारण बदलतं. देशाचं नेतृत्व कोण करतं? देशातील 140 कोटी जनतेने कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे? असा प्रश्न येतो त्यावेळ मोदींचं नाव पुढे येतं. आज जगात भारताची शान वाढवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. परदेशात ज्यावेळी ते जातात त्यावेळी अगदी उत्साहानं त्यांचं स्वागत केलं जातं. एक काळ असा होता की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. परंतु, नंतर असा काही करिश्मा मोदी साहेबांनी दाखवला की त्याच अमेरिकेने त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकलं.
आताही जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून कुणाची ओळख असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांची आहे. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात ती एक दैवी देणगी असते. दैवी शक्ती असते.
काँग्रेसचं ठरलं! पुण्यातून रविंद्र धंगेकर तर सोलापुरात प्रणिती शिंदेंना उमेदवारी…
आराम शब्द मोदींच्या डिक्शनरीत नाही
पंतप्रधान मोदींच्या दोन टर्ममध्ये देशात विमानतळं झाली, महामार्गांचे जाळे विणले गेले, मेट्रो रेल्वे आली, रेल्वेचं जाळं तयार झालं. अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले. जलवाहतुकीसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या. अटल सेतू, कोस्टल रोड यांसारखे प्रकल्प उभे राहिले. जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आहे. आता अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं उद्दीष्ट मोदी साहेबांनी निश्चित केलं आहे.
मी अनेक राजकीय लोकं पाहिली. पण मागील दहा वर्षात कोणतीही सुट्टी मोदींनी घेतली नाही. आपण आपल्या लोकांत दिवाळी साजरी करतो पण मोदी साहेब देशाच्या सीमेवर सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करतात. आराम हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत कुठेही नाही, असे अजित पवार म्हणाले.