Amol Kolhe on MP Suspension : संसदेत काही तरुणांची घुसखोरी त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे निलंबन (MP Suspension) यामुळे हिवाळी अधिवेशन चर्चेत आहे. संसदेत घुसखोरीच्या मुद्द्यावर (Parliament Security Breach) चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या 141 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. निलंबन कोणत्या कारणानं केलं, सभागृहात नेमकं काय घडलं होतं याची वेगळीच स्टोरी खा. अमोल कोल्हे यांनी सांगितली. खा. कोल्हे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकावर घणाघाती टीका केली.
संसदेतील खासदारांच्या निलंबनावर पत्रकारांनी कोल्हेंना प्रश्न विचारला. त्यावर कोल्हे म्हणाले, सुप्रिया सुळे निलंबित होणं हा दिल्लीत मोठा चर्चेचा विषय होता. सलग आठवेळा संसदरत्न पुरस्कार असेल. पहिल्या टर्ममध्ये मला दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. शरद पवार साहेबांनी परंपरा घालून दिली आहे की संसदीय नियमांचे पालन करून राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य कधीच सभापतींच्या वेलमध्ये सुद्धा जात नाही. पंतप्रधानांनी सुद्धा याचा उल्लेख केला आहे. असं असताना जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सभागृहात आग्रही भूमिका घेतली. कांद्याच्या निर्यातबंदीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी आम्ही केली. त्यानंतर तातडीनं निलंबन केलं. अध्यक्ष निलंबनाच्याच मूडमध्ये होते की काय असा प्रश्न पडतो. पण, या 141 खासदारांच्या निलंबनामुळे केंद्र सरकारचा बुरखा फाटला आहे, अशी टीका कोल्हे यांनी केली.
जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की 2014 साली मध्ये संसदेच्या पायऱ्यांवर पंतप्रधान नतमस्तक झाले होते आज त्याच पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सदनात या, निवेदन द्या हे जर सांगावं लागत असेल तर नेमका चेहरा कोणता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे. काल भाजपाचा नेता असंही म्हणाला की आम्हाला जे काही सांगायचंय ते आम्ही जनतेत जाऊन सांगू पण, सभागृहात सांगणार नाही. मग ज्या संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होता त्या संसदेत येऊन निवेदन करण्याची तुमची जबाबदारी आहे हे तुम्ही विसरलात का?, असा सवाल कोल्हे यांनी विचारला.
जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे
जर 141 खासदारांचं निलंबन होत असेल तर ही वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे हा साधा सरळ प्रश्न आहे. जातनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. अनेक समाजांची तशी मागणी आहे. आरक्षण कोणत्या आधारावर व्हावं यासाठी जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. पण ज्याठिकाणी मतांचं ध्रुवीकरण होतं यावर प्रश्न निर्माण होतात ही भीती त्या संघटनांना असू शकते. परंतु, जातनिहाय जनगणना ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जातीजातीत एकोपा रहावा यासाठी जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे.
Amol Kolhe अजित पवार गटात? शरद पवारांचं नाव घेत कोल्हेंनीच खोडला तटकरेंचा दावा
राम मंदिराचं स्वागत, आता रामराज्यही आणा
राम मंदिराचं उद्घाटन होतंय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कोट्यावधी लोकांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यामुळे त्याचा आम्हाला आनंदच आहे. मला निमंत्रण नाही पण माझी अपेक्षा आहे की राम मंदिराचं जितक्या थाटामाटात कराल तितकीच या देशात रामराज्य आणण्याची जबाबदारी तुमची आहे याची जाणीव ठेवा. हातात धनुष्यबाण घेतलेला नको तर आशिर्वादाचा हात असलेला राम हवा. आम्हीही त्याचे भक्त आहोत. फक्त रामराज्य आणा.