Sharad Pawar : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांची मतं फुटली होती. या आठ आमदारांमध्ये हिरामण खोसकर यांचाही समावेश होता असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. या आमदारांवर कारवाई करण्याचा इशाराही पक्ष नेतृत्वाने दिला होता. परंतु, प्रत्यक्षात कारवाई केली नसली तरी या आमदारांची पक्षांतर्गत कोंडी केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी स्थिती निर्माण झाल्याने या आमदारांत अस्वस्थता वाढली आहे. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या (Sharad Pawar) भेटीला आल्याची माहिती मिळाली आहे.
संशय असेल तर मतपत्रिका चेक करा; हिरामण खोसकरांनी सांगितलं आमदार फुटीचा सर्व घटनाक्रम
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात ते आठ मतं फुटली (Maharashtra MLC Election) यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. कारण या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणता आला नाही. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची 16 आणि काँग्रेसचे सात अशी 23 मते होती. यातील काँग्रेसची मतं फुटली. मिलींद नार्वेकर विजयी झाले. परंतु, जास्तीची मते महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना हस्तांतरीत करता आली नाहीत.
या प्रकारानंतर क्रॉस व्होटिंगचा आरोप काँग्रेसच्या आमदारांवर झाला. या आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत पक्षनेतृत्वाने दिले होते. या घडामोडीनंतर आता यातील आमदार हिरामण खोसकर थेट शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आपल्यावर होत असलेला क्रॉस व्होटिंगचा आरोप चुकीचा असल्याचे शरद पवारांना सांगणार आहोत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठीही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या उपरही काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते जे ठरवतील ती भूमिका खोसकर घेणार असल्याची माहिती आहे.
मोठी घडामोड : यावेळी जास्त कुणी भेटणार नाही; विधानसभेसाठी बारामतीतून अजितदादांचं बॅकआऊट?
दरम्यान, याआधीही खोसकर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. आता पुन्हा खोसकर शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. लवकरच ते शरद पवारांची भेट घेतील. या नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार काँग्रेसकडे मध्यस्थी करणार का? किंवा खोसकर यांना राष्ट्रवादीकडून तिकीटाचा शब्द देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.