Download App

एक किंवा दोन अपत्यांबाबत अजितदादा आग्रही; घरांचं कारण पुढे करत सांगितलं वास्तव

Ajit Pawar : ‘मी 1991 मध्ये ज्यावेळी पिंपरी-चिंचवडमधून पहिल्या वेळेस खासदार झालो त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबलं पाहिजे. नाहीतर ब्रह्मदेव जरी आला तरी सगळ्यांना घरे बांधून देऊ शकणार नाही. सरकारबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड आणि आकुर्डी येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील 938 सदनिकांची सोडत अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडली. यावेळी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पत्रकारांची तक्रार, अजितदादांनी थेट आयुक्तानांच फटकारलं; काय होतं पोलिसांचं फर्मान?

तक्रार करा, अशा शहाण्यांना सोडणार नाही 

सोडत पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही गैरप्रकार होण्यास वाव नाही. कोणताही दलाल प्रशासनाने नेमलेला नाही. तरी देखील कुणी नंबर काढू देतो असे म्हणत असेल तर त्याची तक्रार करा. त्यांचा बंदोबस्त करू. अशा शहाण्यांना सोडणार नाही. असले  कोणतेही एजंट प्रशासनाकडून नेमलेले नसते. अगदी कुणाचे पीए असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. नाहीतर दस का बीसचे प्रकार घडतात. नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणणार की माझ्यामुळेच तुमचे स्वप्न पूर्ण झाले. असे म्हणून पैशांची लुबाडणूक करणार अशा शहाण्यांना मी सरळ करणार आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी इशारा दिला.

अजित पवार पुढे म्हणाले, सोडतीत काही जणांचं नशीब उजळेल तर काही जणांना घरे मिळणार नाहीत. त्यामुळे निराश होऊ नका. ज्यांच्या घराचं स्वप्न साकार होईल त्यांनीही भारावून जाऊ नका. पैसे जर वाचले असतील तर उधळपट्टी करू नका, असा सल्ला अजित पवार यांनी उपस्थितांना दिला.

follow us