पत्रकारांची तक्रार, अजितदादांनी थेट आयुक्तानांच फटकारलं; काय होतं पोलिसांचं फर्मान?
Ajit Pawar in Pimpri Chinchwad : एखादा मोठा नेता किंवा मंत्र्याचा दौरा असला की पोलिसांचा बंदोबस्त असतोच. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असल्याने सर्वसामान्यांना कोसो दूर ठेवण्याची रणनिती आखली जाते. सामान्य लोकांचे समजू शकते पण, असाच प्रसंग पत्रकारांच्या बाबतीत घडला तर. होय, असा प्रसंग पत्रकारांच्याच बाबतीत घडला आहे अन् तोही चक्क अजितदादां समोर. पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या अजित पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी ज्यावेळी पत्रकार पुढे सरसावले त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यानंतर पोलिसांच्या या आडमुठेपणाची तक्रार थेट अजित पवारांकडेच (Ajit Pawar) करण्यात आली. अजितदादांनीही सकारात्मक प्रतिसाद देत थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचीच कानउघाडणी केली.
Ajit Pawar : ‘मला फुकटचे सल्ले देऊ नका’ CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सदनिकांची सोडत आज अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार पुढे आले त्यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आडमुठी कायम राहिली. इतकेच काय तर डीसीपी स्वप्ना गोरे यांनी तर अजित पवार किंवा कोणत्याही नेत्याच्या जवळ जायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचा अध्यादेश घेऊन या असे फर्मान सोडले. पण, यावर हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. आता या फर्मानामागे कोण असणार याचा अंदाज पत्रकारांना आला. मग त्यांनीही थेट अजित पवार यांना घडलेला प्रसंग सांगत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची तक्रार केली.
अजितदादांनी आधी पत्रकारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नंतर चौबे यांना बोलावून घेत त्यांची कानउघाडणी केली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस किंवा मी आम्हाला झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांना पोलिसांनी अडवू नये. ते त्यांचं काम करत असतात. प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना घटनेने दिला आहे त्यामुळे पोलीस त्यांची अडवणूक करू शकत नाहीत. पत्रकारांशी बोलायचं की नाही ते आमचं आम्ही ठरवू. यापुढे पत्रकारांची तक्रार यायला नको, अशा शब्दांत अजितदादांनी चौबेंना सुनावले.
Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर
पोलीस आयुक्त चौबे यांच्या कार्यपद्धतीवर पत्रकार कमालीचे नाराज आहेत. पोलिसांकडून होत असलेल्या अडवणुकीची तक्रार पत्रकारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावेळी फडणवीस यांनीही पत्रकारांना माझ्याजवळ येऊ देऊ नये अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या नाहीत असा खुलासा करत त्यांनी चौबेंना सूचना दिल्या होत्या.