Accident on Lohroad in Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. (Accident ) या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत एक दुचाकी पुलावरून खाली कोसळली.
पुणे विद्यापीठात शिकल्यावर कुठंही राजकारण करता येतं, जेएनयूच्या कुलगुरूचं मोठं विधान
चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या सोमेश्वर श्रीधर काळे यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात काळे आणि त्यांचे मित्र अक्षय सुरेश बाटे हे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात एवढ्यावरच थांबला नाही. धडकेनंतरही मोटार चालकाने गाडी न थांबवता पुढे जाऊन राजेंद्र वराडे, शुभदा वराडे, चैतन्य पुराणिक आणि पद्मजा पुराणिक यांच्या दुचाकींनाही धडक दिली. यामुळे वराडे आणि पुराणिक दांपत्य जखमी झाले. या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की एका दुचाकीवरील स्वारांचा तोल सुटून ती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
नागरिकांमध्ये संताप
घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मोटार चालक समर्थ कुलकर्णी याला ताब्यात घेतले. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
मद्यपान केल्याचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी चालक समर्थ कुलकर्णी याने मद्यप्राशन करून वाहन चालवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. निगडी पोलिस ठाण्यात सोमेश्वर काळे यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.