Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात नाशिक (PM Narendra Modi) दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोदींचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काल पुन्हा एकदा शरद पवार यांनी घराणेशाहीच्या राजकारणाला कसं नाकारलं याचा खुलासा केला.
शरद पवार यांनी काल बारामतीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली? महाराष्ट्रात पोहोचवली कुणी? सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या खुर्चीवर बसवले कुणी? सगळ्या समाजाच्या अनेकांना सत्तेची खुर्ची दिली. काही लोकांना जाणीवपूर्वक संधी द्यायची असते तीही दिली. त्यांच्या काही चुका झाल्या तरीही त्यांना संधी दिली. त्यावेळी लोक मला सांगायचे ताई (सुप्रिया सुळे) तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांना संधी द्या. पण पात्रता असतानाही स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला काहीतरी योगदान असेल ना? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
Sharad Pawar : नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा; पवारांनी व्यक्त केली चिंता
यानंतर त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. आज आपल्याला जे लोक सोडून गेले आहेत त्यांना सत्तेत राहण्याची संधी दिली होती की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. आज अजित पवारांच्या गटात अनेक लोक मनाने नाही तर भीतीने गेले आहेत. तर काहीजण सत्तेसाठी गेले आहेत. आणखीही काहीजण पदासाठी गेलेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.
आज जे लोक तिकडे गेलेत ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. पण आज ते भाजपसोबत आहेत. सत्ता काय येते जाते. सत्ता लोकांच्या जीवावरची असली पाहजे. आपल्याकडे लोकशाही आहे, तेव्हा लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक असे दोन पक्ष असले पाहिजेत. जर एकच पक्ष राहिला तर तो हिटलरचा हुकूमशाहीचा पक्ष असतो. आपल्याला हुकूमशाहीचा पक्ष नको तर लोकांचा पक्ष पाहिजे असे शरद पवार यावेळी म्हणाले.