Pune ZP Election : मतदारसंघात पूर्णपणे होल्ड, भाजपच्या लाटेतही बाजी मारत विधानसभेला हॅटट्रीक. साखर कारखाना, स्थानिक संस्थांही ताब्यात पण यंदाच्या विधानसभेला पराभव. मजबूत बालेकिल्ला हातातून निसटला. त्यानंतर पक्षांतर केलं. मजबूत पक्ष असलेल्या भाजपमध्ये प्रवेश. पण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे घेरलेले. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रोखण्यासाठी अजितदादांनी डाव टाकलाय. अजितदादांचा आमदारही मजबुतीने लढतोय. आता तुमच्या लक्षात आले असेल, नसेल तर सांगतो, ही लढाई आहे पुणे जिल्ह्यातील भोरची. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरविरुद्ध (Shankar Mandekar) माजी आमदार व भाजपचे संग्राम अनंतराव थोपटेमधील (Sangram Anantrao Thopate). शंकर मांडेकरांनी दोन डाव मारेलत. आता झेडपी निवडणुकीत (Pune ZP Election) तिसरा डाव कसा रंगतोय, यात कोण बाजू मारेल हेच पाहुया…
थोडं आपण इतिहासात जावूया…
शंकर मांडेकरांकडून विधानसभेला पराभव
भोर, वेल्हा, मुळशी असा विधानसभेचा मतदारसंघ. या मतदारसंघावर अनेक दशकं थोपटे घराचे वर्चस्व राहिलेले. 2009, 2014 आणि 2019 असं सलग तीन टर्म संग्राम थोपटे हे या मतदारसंघातून बाजी मारत राहिले. 2014 आणि 2019 ला राज्यात भाजपची लाट होती. त्यातही थोपटे विजयी झाले. मताधिक्य कमी झाले पण भोर म्हणजे थोपटेच हे समीकरण राहिलं. लोकसभा निवडणुकीत थोपटेंनी सुप्रिया सुळेंना येथून 19 हजारांचे लीड मिळून दिले होते. पण 2024 च्या विधानसभेला फासे उलटे पडले. शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या शंकर मांडेकरांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत घेतले, उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं. मांडेकर हे 19 हजार 638 मतांनी विजयी झाले. भोर तालुक्यातील मतदार थोपटेंच्या पाठीशी होते. पण मुळशीनी स्थानिक उमेदवार म्हणून मांडेकरांना भरभरून मते दिली. मुळशीतून मांडेकरांना 53 हजार मतांचे मोठे लीड होते. त्यावर ते विजयी झाले. लोकसभेला थोपटेंनी मदत करावी, असे अजितदादांना वाटत होते. पण थोपटेंनी सुप्रिया सुळेंना मदत केली. ही सल अजितदादांच्या मनात होती. त्याचे उट्टे अजितदादांनी विधानसभेला काढले.
संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश अन् दुसरा झटका
विधानसभेला पराभव झाल्यानंतर संग्राम थोपटे गेल्या वर्षात एप्रिल महिन्यात भाजपवासी झाले. राजगड साखर कारखान्याला कर्ज मिळविणे, कार्यकर्त्यांना बळ मिळाले पाहिजे म्हणून ते भाजपात गेले. पण गेल्या महिन्यात झालेल्या भोर नगरपालिका निवडणूक थोपटेंना जड गेली. येथे अजित पवार व आमदार शंकर मांडेकर यांनी जोरदार ताकद लावली. रामचंद्र आवारे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले. हे आवारे काँग्रेसमध्ये होते. पण निवडणूक लागताच ते राष्ट्रवादीत आले होते. भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येथे सभा घेतली होती. त्यानंतर नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. थोपटेंनी 20 पैकी 16 जागा जिंकून भोर माझ्याच पाठीशी असल्याचे दाखवून दिलं. पण नगराध्यक्षपद गेल्याची सल त्यांना असणारच.
आता थोपटेंविरुद्ध मांडेकरांचा तिसरा संग्राम
आता जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपचे थोपटे विरुद्ध आमदार मांडेकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झालाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने राष्ट्रवादीचे ताकद वाढलीय. भोरमध्ये चार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे आठ गण आहेत. उत्रौली-कारी गटातून संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या भाजपकडून उमेदवारी करतायत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार तगडा आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे येथून निवडणूक लढवातयत. त्यामुळे थोपटेंना पत्नीला निवडून आणण्यासाठी संघर्ष करावे लागणार आहे. भोरमधील पंचायत समिती, झेडपी गट ताब्यात घेऊन थोपटेंच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचा इरादाच मांडेकर व अजितदादांचा आहे. पण थोपटेही कच्चे खेळाडून नाहीत. दोन निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याचा त्यांनी आखलेलाच असणार आहे. आता बघुया तिसऱ्या राजकीय संग्राममध्ये कोण जिंकतय ते….
