Download App

1983 ते 2024.. एकही सामना न खेळता ठरले चॅम्पियन; ‘या’ खेळाडूंचं टायमिंगही खास

भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.

T20 World Cup : भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय संघाने शानदार खेळ करत अकरा वर्षांचा दुष्काळ (T20 World Cup Final) संपवला. भारताचा हा दुसरा टी 20 विश्वकप विजय आहे. याआधी 2007 मध्ये भारताने पहिल्याच टी 20 विश्वचषकात विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा अशी संधी थेट अकरा वर्षांनी मिळाली आहे. सन 1983 आणि 2011 मध्ये भारताने वन डे विश्वचषकावरही नाव कोरल होतं. एकंदरीत हा भारताचा सहावा आयसीसी (IND vs SA Final) ट्रॉफी विजय आहे.

सन 2000 आणि 2002 मध्ये टीम इंडियाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताच्या या विश्वविजयात असेही काही खेळाडू होते ज्यांनी एकही सामना खेळला नाही मात्र ते चॅम्पियन ठरले आहेत. चला तर मग असे कोणते खेळाडू आहेत याची माहिती घेऊ या..

सन 1983 मध्ये भारताने पहिल्यांदाच आयसीसी पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी कपिल देव यांच्या (Kapil Dev) नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. या स्पर्धेसाठी भारत 14 खेळाडूंसह इंग्लंडला पोहोचला (IND vs ENG) होता. 13 खेळाडू विविध सामन्यांत संघाचा हिस्सा राहिले. यात फक्त सुनील वालसन हेच एक खेळाडू होते ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, वालसन यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. कारण यानंतर त्यांची भारतीय संघात कधीच निवड होऊ शकली नाही. असे असले तरी वालसन प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहिले. वालसन डाव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज होते. 1981 ते 1988 या काळात त्यांनी 75 सामन्यांत तामिळनाडू (Tamil Nadu) आणि नंतर रेल्वेचे प्रतिनिधित्व केले.

IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला

1983 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघात कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, सुनील गावस्कर, सैयद किरमानी, मदन लाल, संदीप पाटील, बलविंदर संधू, यशपाल शर्मा, रवी शास्त्री, के. श्रीकांत, दिलीप वेंगसरकर आणि सुनील वालसन यांचा समावेश होता.

2007 चा टी 20 वर्ल्डकप

सन 2007 मधील टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव (Pakistan) करत विश्वचषकावर नाव कोरलं होतं. हा पहिलाच टी 20 वर्ल्डकप होता आणि या स्पर्धेत भारताने जबरदस्त प्रदर्शन केले होते. भारताने या स्पर्धेत एकूण सात सामने खेळले त्यातील पाच सामने जिंकले होते. स्कॉटलंड विरुद्धचा सामना नाणेफेक न होताच रद्द झाला होता. तर न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेसाठी भारत 15 खेळाडूंना घेऊन गेला होता. यातील 14 खेळाडू कोणत्या ना कोणत्या तरी सामन्यात खेळले होते. फक्त पियूष चावला याला (Piyush Chawala) एकही सामन्यात संधी मिळाली नव्हती.

त्यावेळच्या भारतीय संघात एमएस धोनी, युवराज सिंह, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, पियूष चावला, जोगिंदर शर्मा, युसुफ पठाण, इरफान पठाण, अजित आगरकर, हरभजन सिंग, आर पी सिंह आणि एस. श्रीसंत यांचा समावेश होता.

2011 वन डे वर्ल्डकप

सन 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारतीय संघाने वन डे विश्वचषकावर नाव कोरल. या सपर्धेतील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. या स्पर्धेत टीम इंडियाने एकूण नऊ सामने खेळले होते. त्यातील सात सामने जिंकले होते. इंग्लंड विरुद्धचा सामना टाय झाला होता तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात (IND vs SA) पराभव झाला होता. या स्पर्धेसाठीच्या पंधरा सदस्यीय संघात आधी प्रवीण कुमारचा समावेश करण्यात आला होता. परंतु स्पर्धा सुरू होण्याआधी तो दुखापत ग्रस्त झाला होता. त्यामुळे प्रवीण कुमारच्या जागी पियूष चावलाला संधी मिळाली होती. या स्पर्धेत मात्र 15 खेळाडूंना कोणत्या ना कोणत्या तरी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.

एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’मधून निवृत्ती

या स्पर्धेतील भारतीय संघात एम एस धोनी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंह, सुरेश रैना, युसुफ पठाण, पियूष चावला, हरभजन सिंह, आर आश्विन, जहीर खान, मुनाफ पटेल, आशिष नेहरा आणि एस. श्रीसंत यांचा समावेश होता.

2024 टी 20 वर्ल्डकप

यावेळच्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघ 15 खेळाडूंसह (ICC T20 World Cup 2024) पोहोचला होता. यात काही खेळाडू राखीव होते. यावेळी खेळाडू निवडताना निवडकर्त्यांना मोठी कसरत करावी लागली. कारण स्पर्धा जास्त होती. त्यामुळे रिंकू सिंह (Rinku Singh) आणि शुभमन गिल यांच्या सारख्या खेळाडूंना राखीव राहावं लागलं. चार स्पिनर्सना सहभागी केले म्हणून टीका झाली होती पण रोहितने सिद्ध करून दाखवलं की त्याचा हा निर्णय कसा योग्य होता. या स्पर्धेत असेही काही खेळाडू होते ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

या संपूर्ण स्पर्धेत रोहित शर्माने फक्त एक बदल केला तो म्हणजे सिराजच्या जागेवर कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी दिली. तीन खेळाडू असे होते ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), संजू सॅमसन आणि युजवेंद्र यांचा (Yjvendra Chahal) समावेश आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, सिराज आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश होता.

follow us