Womens T20 World Cup 2024 : महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारताला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. शारजाहला झालेल्या या सामन्यात भारतासाठी शेवटपर्यंत कर्णधार हरमनप्रीत कौरने झुंज दिली होती. ती अर्धशतक करून शेवटपर्यंत नाबाद राहिली.
Babar Azam : मोठी बातमी! बाबर आझमला पाकिस्तान बोर्डाचा धक्का, संघातून डच्चू
तिचे मात्र भारताला विजय मिळवून देण्याचे प्रयत्न शेवटी तोडके पडले. पण असं असलं तरी तिने एक मोठा वैयक्तिक विक्रम या सामन्यात केला आहे. तिने या सामन्यात ४७ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्यामुळे आता तिने महिला टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या मिताली राजची बरोबरी केली आहे.
शानदार, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 86 धावांनी उडवला बांगलादेशचा धुव्वा
हरमनप्रीतने आता महिला टी२० वर्ल्डकपमध्ये ३९ सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ७२६ धावा केल्या आहेत. मितालीनेही महिला टी२० वर्ल्डकपमध्ये २४ सामन्यात ५ अर्धशतकांसह ७२६ धावा केल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ स्मृती मानधना असून २५ सामन्यांत ५२४ धावा केल्या आहेत.
महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
७२६ धावा – हरमनप्रीत कौर (३९ सामने)
७२६ धावा – मिताली राज (२४ सामने)
५२४ धावा – स्मृती मानधना (२५ सामने)
४०७ धावा – जेमिमाह रोड्रिग्स (१९ सामने)
३७५ धावा – पुनम राऊत (१५ सामने)
टॉप-५ कर्णधारांमध्येही एन्ट्री
महिला टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांमध्ये हरमनप्रीत आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिच्या आता कर्णधार म्हणून १९ सामन्यांमध्ये ४८१ धावा झाल्या आहेत. तिने या यादीत सुझी बेट्सला मागं टाकलं आहे. तिने १४ सामन्यात ४७३ धावा केल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर मेग लॅनिंग आहे. तिने ३० सामन्यांत ८५४ धावा केल्या आहेत.
महिला टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार
८५४ धावा – मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलिया (३० सामने)
७६८ धावा – शारलोट एडवर्ड्स, इंग्लंड (२४ सामने)
५०० धावा – चमारी अट्टापट्टू, श्रीलंका (१८ सामने)
४८१ धावा – हरमनप्रीत कौर, भारत (१९ सामने)
४७३ धावा – सुझी बेट्स, न्यूझीलंड (१४ सामने)
भारताचा पराभव
रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला २० षटकात ९ बाद १४२ धावाच करता आल्या. हरमनप्रीत व्यतिरिक्त दिप्ती शर्माने २९ धावांची खेळी केली. या दोघींव्यतिरिक्त कोणालाही २५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.