Download App

राहुल द्रविडला मुदतवाढ पण अनेक प्रश्न अनुत्तरित, क्रिकेटप्रेमींमध्ये संभ्रम

Rahul Dravid : वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल होतील, असे तर्क लावले जात होते. प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार का? राहुल द्रविडला (Rahul Dravid) मुदतवाढ मिळणार का? याची देखील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता बीसीसीआयने (BCCI) प्रशिक्षक पदाबद्दल होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ मुदतवाढ देणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच जो ​​सपोर्ट स्टाफ टीम इंडियासोबत गेले 2 वर्षे काम करत आहे, तीच टीम भविष्यातही त्याच भूमिकेत काम करत राहणार आहे. मात्र, बीसीसीआयने अजूनही काही प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.

राहुल द्रविड किती काळ कोच राहणार?
बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ किती काळासाठी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही मुदतवाढ 2 वर्षांसाठी असेल तर राहुल द्रविडची टीम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत टीम इंडियासोबत राहील. मात्र, यात काही शंका आहेत कारण काही काळापूर्वी निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचे एक विधान समोर आले होते. यात म्हटले होते की राहुल द्रविडच्या टीमला टी-20 विश्वचषक 2024 पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे द्रविडच्या कार्यकाळाबद्दल स्पष्टता येणे बाकी आहे.

मोठी बातमी : टीम इंडियाचा हेड कोच पुन्हा ‘द वॉल’; BCCI कडून राहुल द्रविडला एक्सटेन्शन

प्रशिक्षक म्हणून द्रविडला किती मानधन मिळते?
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला आतापर्यंत दरवर्षी सुमारे 10 कोटी रुपये फी म्हणून मिळत होती. जेव्हा त्याचा कार्यकाळ संपला तेव्हा राहुल द्रविड कोणत्याही आयपीएल संघासोबत सामील होऊ शकतो, याचा अर्थ त्याला फक्त दोन महिन्यांत कोट्यवधी रुपये कमवण्याची संधी होती. द्रविडने सध्या टीम इंडियासोबत राहण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्या फीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टता नाही. द्रविड त्याच पगारावर राहिला आहे की त्याची फी वाढवली आहे, हा प्रश्न आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून 12 कोटी रुपयांपर्यंत फी मिळत आहे, मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Glenn Maxwell : ‘मॅक्सवेल’च्या तुफानी खेळीचा ‘हिटमॅन’ला फटका; मोठं रेकॉर्ड संकटात

दुसऱ्या टर्ममध्ये व्हिजन काय असेल?
द्विपक्षीय मालिका किंवा खेळाडूंच्या कामगिरी बाबतीत राहुल द्रविडचा कार्यकाळ चांगला होता, पण टीम इंडियासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकणे हे त्याचे मुख्य लक्ष्य होते. द्रविडच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात टीम इंडियाला तीन संधी मिळाल्या, पण तिन्ही वेळा संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही. T-20 विश्वचषक 2022, कसोटी चॅम्पियनशिप फायनल आणि एकदिवसीय विश्वचषक या तिन्ही वेळा भारतीय संघाने ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली.

आता नवीन कार्यकाळात राहुल द्रविड कोणत्या दृष्टीकोनातून पुढे जातो हे पाहावे लागेल, कारण टी-20 विश्वचषक 2024 सोबतच टीम इंडियाच्या समोर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप देखील आहे.

Tags

follow us