IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL 2024) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाला मोठा बसला आहे. या सामन्यात श्रीलंकेने 110 धावांनी भारताचा पराभव केला आहे. याच बरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारताने तब्बल 27 वर्षांनंतर श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली आहे. या मालिकेचा पहिला सामना बरोबरीत सुटला होता तर दुसऱ्या सामन्यात भारताचा 32 धावांनी श्रीलंकेने पराभव केला होता.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 26.1 षटकांत केवळ 138 धावाच करू शकला. 249 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला. शुभमन गिल 14 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा 20 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत 6, विराट कोहली 20 आणि अक्षर पटेल 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. श्रेयस 8, रियान पराग 15 आणि शिवम 9 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर 30 धावा करून बाद झाला तर कुलदीप यादव 6 धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून ड्युनिथ वेलालगेने सर्वाधिक 5 बळी घेतले. महिष तिक्षाना आणि जेफ्री यांनी 2-2 बळी घेतले.
श्रीलंकेची दमदार सुरुवात
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला सलामीवीर पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली. पथुम 65 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. यानंतर कुसल मेंडिस आणि अविष्का यांच्यात 94 चेंडूत 82 धावांची भागीदारी झाली. रियान परागने अविष्काला पॅव्हेलियनमध्ये पाठवून ही भागीदारी तोडली. अविष्का 96 धावा करून बाद झाली.
कर्णधार चारिथ असलंकालाही परागने बाद केले. भारताकडून रियान परागने तीन बळी घेतले तर श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने सर्वाधिक 96 धावा केल्या.
27 वर्षांनंतर मालिका गमावली
तिसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने तब्बल 27 वर्षांनंतर श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गमावली होती.
… तर धाराशिव बाहेर जाऊ दिलं नसतं’, जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना थेट इशारा
अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 3-0 असा पराभव केला होता. त्या मालिकेत सनथ जयसूर्या सामनावीर ठरला होता तर आता तो श्रीलंका संघाचा अंतरिम प्रशिक्षक आहे.