मुंबई : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळी आणि मोहम्मद शामीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेविरोधात फायलन मॅच खेळणार आहे. उद्या (16 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथे दुसरी सेमीफायनलची मॅच खेळवली जाणार आहे. (India revenged their semi-final defeat against New Zealand in 2019)
दरम्यान, या मॅचनंतर “बाप का, दादा का, भाई का; सबका बदला लेगा रे तेरा फैसल” हा 11 वर्षांपूर्वीच्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील डायलॉगप्रमाणेच भारताच्या न्यूझीलंडवरील विजयावर प्रतिक्रिया उमटत आहेत. 2019 मधील न्यूझीलंडविरोधातील सेमीफायनलमध्ये झालेल्या भारताच्या पराभवाचा आणि त्याच सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या रनआऊटचा बदला आता पूर्ण झाल्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. “बाप का, दादा का, माही भाई के रनआऊट का; सबका बदला लेगा तेरा चिकू या आशयाचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरोधात न्यूझीलंडच्या संघाने नेहमीच सरस कामगिरी केली आहे. दोन्ही संघांत विश्वचषकात आतापर्यंत दहा सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंडने 5 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने चार सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. मागील 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाचा (Team India) विजयी रथ रोखला होता. त्यातही महेंद्रसिंह धोनी रनआऊट झाल्याची कटू आठवण सर्वच भारतीयांच्या मनावर कोरली गेली होती.
यंदाच्या विश्वचषकात मात्र भारताने न्यूझीलंडला दोनवेळा पराभूत करण्याची कामगिरी केली. आधी साखळी सामन्यात 4 विकेट्सने भारताने न्यूझीलंडला लोळवले होते. या सामन्यात मोहम्मद शामीने 5 विकेट्स घेत आणि विराट कोहलीने अर्धशतक झळकावत शानदार खेळी केली होती. त्यानंतर आता सेमीफायनलमध्येही भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आहे. विशेष म्हणजे या सामन्यातही मोहम्मद शामी आणि विराट कोहली यांचा खेळ भारताच्या विजयात महत्वपूर्ण ठरला. एकूणच या पराभवासह भारताने सर्व पराभावाचे वचपे काढले असल्याची भावना व्यक्त होत आहे.