Download App

टीम इंडिया अवघ्या 46 धावांत गारद; बंगळुरूत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दहशत, 5 फलंदाज शून्यावर बाद

India VS New Zealand 1st Test : बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांची ‘दहशत’ पाहायला मिळाली. टीम इंडिया अवघ्या 46 धावांत कोसळल्याचं समोर आलंय. भारत आणि न्यूझीलंडमधील (India VS New Zealand) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज बेंगळुरूमध्ये सुरू आहे. भारतीय संघ पहिल्या डावामध्ये केवळ 46 धावांवर सर्वबाद झालाय. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. मॅट हेन्री आणि विल्यम ओ’रूर्क यांच्या घातक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत टीम इंडियाला फक्त 46 धावांवर (India VS New Zealand) रोखले.

मायदेशातील कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. टीम इंडियासाठी ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. मॅट हेन्रीच्या 5 विकेट्स आणि विल्यम ओरूकच्या 4 विकेट्ससमोर भारतीय फलंदाजांचे काही चालले नाही. ‘तू चल मैं आया’च्या धर्तीवर टीम इंडियाचे सर्व स्टार खेळाडू बाद झाले होते. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले.

रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती

सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस होता. यानंतरही कर्णधार रोहित शर्माने (India VS New Zealand) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात अतिशय खराब झाल्याचं दिसतंय. कर्णधार रोहित शर्मा केवळ 9 धावांवर बाद झाला. यानंतर विल्यम ओरूकने विराट कोहलीला देखील शून्यावर बाद केलं. यानंतर सर्फराजला देखील खातं उघडता आलं नाही.

India Cricket : क्रिकेटमधील ‘डायमंड डक’ म्हणजे काय? टीम इंडियासाठी ठरला अनलकी !

10 धावांमध्ये तीन विकेट पडल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्याकडून सगळ्यांना अपेक्षा होत्या. पण हे दोघेही किवी गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकू शकले नाहीत. दोघांमध्ये 21 धावांची भागीदारी झाली, मात्र 31 धावसंख्येवर ओरूकने जैस्वालला बाद केलं. एका चौकाराच्या जोरावर जैस्वालने केवळ 13 धावा केल्या.

केएल राहुल जयस्वाल बाद झाल्यानंतर क्रीजवर आला. मात्र राहुल देखील खातं न उघडता सहा चेंडू खेळून तंबूत परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन देखील शून्यावर बाद झाले. यानंतर जसप्रीत बुमराह फक्त एक धावावर समाधान मानावं लागलं. टीम इंडियाने अवघ्या 40 धावांमध्ये 9 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना फक्त 6 धावांची भर घालता आली. अशाप्रकारे टीम इंडियाचे सर्व खेळाडू 46 धावांवर गारद झाले.

 

follow us