IPL 2025 CSK : येत्या २२ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सने जवळपास महिन्याभर आधी तयारीला सुरुवात केली आहे. (CSK) यंदा चेन्नई सुपर किंग्स संघात अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचेही पुनरागमन झाले आहे.
जवळपास १० वर्षांनी अश्विन पुन्हा चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. त्याने २००९ साली याच संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१० आणि २०११ साली विजेतेपद मिळवलेल्या चेन्नई संघाचाही तो भाग होता. पण २०१६ नंतर तो संघातून बाहेर गेला. त्यानंतर तो रायझिंग पुणे सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर आता तो पुन्हा चेन्नई संघात आला आहे.
नुकतेच पीएस रमण यांनी लिहिलेल्या ‘लिओ-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीएसके’ या पुस्तक प्रकाशनासाठी अश्विन एमएस धोनीसह उपस्थित होता. यावेळी त्याने चेन्नई संघाबद्दल आणि एमएस धोनीबद्दल प्रतिक्रिया दिली. अश्विनने असाही खुलासा केला की त्याला त्याच्या १०० व्या कसोटीनंतर निवृत्ती घ्यायची होती, त्याने धोनीलाही फोन करून आमंत्रित केलं होतं. अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने गेल्यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे १०० वा कसोटी सामना खेळला होता.
त्यावेळीची आठवण सांगताना अश्विन म्हणाला, ‘मी धोनीला स्मृतीचिन्ह देण्यासाठी माझ्या १०० व्या कसोटीसाठी आमंत्रण दिलं होतं. तो शेवटचा सामना असेल, असं मी ठरवलेलं. पण तो नाही येऊ शकला. मात्र मी तेव्हा विचारही केला नव्हता की मला परत सीएसकेमध्ये घेऊन इतकी चांगली भेट दिली जाईल. तेव्हापेक्षा ही भेट जास्त मस्त होती. त्यामुळे एमएस तुझे आभार.’
याशिवाय अश्विन चेन्नई संघाबद्दल बोलाताना म्हणाला, ‘२०११ च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. सगळीकडे फिरून येऊन तिथे काय होतं, याचा अनुभव घेणेही छान आहे. यातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. पण एक गोष्ट चेन्नईबाबत वेगळी आहे, ती म्हणजे हा संघ बदलत राहतो, पण तरी नेहमीच तसाच भासतो. जुन्या आठवणी ताज्या करत राहतो.’
‘आज क्रिकेटमध्ये देखील कोणीही तोट्यासाठी बिझनेस करत नाही. मला हे समजते. गोष्टी बदलतात, संघातही खूप बदल होतात. पण चेन्नईत परत आल्यानंतर मला जाणवलं की मी २०१५ मध्ये जेव्हा संघ सोडला तेव्हापासून आत्तापर्यंत एक टक्काही बदल झालेला नाही. क्रिकेट संघ चालवणं आणि यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग हा क्रिकेटलाच केंद्रस्थानी ठेवणे आहे.’ तसंच, अश्विनने सांगितले की चेन्नई संघात परत आल्यानंतर आता त्याला क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. अश्विनने चेन्नईकडून २००९ ते २०१५ दरम्यान खेळताना २२१ सामन्यांत १२० विकेट्स घेतल्या आहेत. तो या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही आहे.
"I called Dhoni for my 100th Test. I invited him to hand over memento in Dharamshala. I wanted to make that my last Test, but he couldn’t make it. What I didn’t expect was that he would give me an even better gift — bringing me back to CSK.” @ashwinravi99 #CSK #chennaisuperkings pic.twitter.com/IWJXJa0eqC
— Santhosh Kumar (@giffy6ty) March 16, 2025