क्रिकेटच्या मैदानात काही गोष्टी केवळ आकडेवारीपुरत्या मर्यादित नसतात; त्या असतात जिद्द, संयम आणि स्वतःवर असलेल्या अढळ विश्वासाच्या. (Sprts) भारतीय क्रिकेटच्या लखलखत्या दुनियेतून अचानक गायब झालेला एक तारा, दोन वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा पुन्हा मैदानात परततो आणि थेट पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचे धाबे दणाणून सोडतो, तेव्हा समजायचे की हा प्रवास साध्या जिद्दीचा नाही, तर एका ‘फिनिक्स‘ भरारीचा आहे.
डिसेंबर 2023 मध्ये जेव्हा इशानला संघातून बाहेर काढले गेले, तेव्हा जग त्याच्यावर तुटून पडले होते. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळले जाणे, हा कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात मोठा मानसिक धक्का असतो. त्याला देशासाठी खेळण्यात रस नाही, तो उद्धट आहे, असे एक ना अनेक शिक्के त्याच्यावर मारले गेले. पण सत्य हे होते की, मानसिक थकव्यामुळे त्याने मागितलेली एक छोटी विश्रांती त्याच्या कारकिर्दीवर काळ बनून आली होती. पाटण्यातील त्याच्या घराच्या खिडकीतून रात्री उशिरापर्यंत दिसणारा दिवा त्याच्या अस्वस्थतेची आणि तयारीची साक्ष देत होता.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु असताना इशान किशनवर मोठी जबाबदारी; बीसीसीआयने केली घोषणा
या कठीण काळात इशान एकटा नव्हता. त्याचे बालपणीचे मित्र सिद्धांत सिंग आणि अंशुमत श्रीवास्तव त्याच्यासाठी ढाल बनून उभे राहिले. जेव्हा जग त्याला विसरले होते, तेव्हा हे मित्र त्याला धीर देत होते. थ्रो-डाउन स्पेशालिस्ट उत्तम मोहंती यांच्यासोबत त्याने तासनतास घाम गाळला. इशानची लेग-साईड भक्कम होती, पण त्याला ‘ऑफ-साईड’चा राजा बनायचे होते. भाऊ, पूर्ण वेगाने चेंडू टाकत राहा, असे म्हणत त्याने हजारो चेंडू खेळून काढले. इतका मोठा स्टार असूनही, सराव संपल्यावर तो आपली किटबॅग स्वतःच उचलायचा. त्याच्या वागण्यात कधीही अहंकाराचा लवलेश नव्हता.
या दोन वर्षांच्या वनवासाने इशानला बदलून टाकले. तो आता केवळ एक आक्रमक फलंदाज राहिला नव्हता, तर एक शांत आणि विचारी माणूस झाला होता. त्याच्या किटबॅगमध्ये आता साईबाबांचा फोटो आणि ‘भगवद्गीता’ यांनी जागा मिळवली होती. त्याने पाटणामध्ये स्वतःची अकॅडमी सुरू करून गरीब मुलांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम हाती घेतले. स्वतःच्या दुःखात न अडकता इतरांना मदत करण्याची ही वृत्तीच त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
2025-26 च्या घरगुती हंगामात इशानने जणू वादळ आणले. रणजीमध्ये 173 धावा, विजय हजारेमध्ये 31 चेंडूत शतक आणि मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडला दिलेले ऐतिहासिक विजेतेपद! या कामगिरीने निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडले. बीसीसीआयने अखेर तो धाडसी निर्णय घेतला. शुभमन गिलच्या जागी इशानला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले. ही केवळ संधी नव्हती, तर इशानने स्वतःच्या बॅटने ओढून घेतलेला सन्मान होता.
टी-20 विश्वचषक 2026, कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियम. भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रचंड दबाव. पण इशानसाठी हा सामना फक्त क्रिकेट नव्हता, तर गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक टीकेचे उत्तर देण्याची वेळ होती. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मारलेला तो षटकार आणि अवघ्या 27 चेंडूत ठोकलेले अर्धशतक… इशानने पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. 80 मीटरच्या बाऊंड्रीवर त्याने मारलेले ते उत्तुंग षटकार पाहून अख्ख्या जगाने उभे राहून टाळ्या वाजवल्या. 40 चेंडूत 77 धावांची ती खेळी सांगून गेली की, सिंह दोन पावले मागे गेला होता, तो झेप घेण्यासाठीच!
ही कथा केवळ धावांची नाही, तर मैत्री, निष्ठा आणि कधीही हार न मानणाऱ्या जिद्दीची आहे. इशानचे हे कमबॅक म्हणजे जगाला दिलेला एकच संदेश आहे. वेळ कितीही वाईट असो, स्वतःवरचा विश्वास ढळू दिला नाही, तर इतिहास नक्कीच घडतो!
