Download App

आफ्रिकाच नाही टीम इंडियानेही केलाय ‘हा’ कारनामा; ‘त्या’ दोन सामन्यांत काय घडलं होतं?

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने दोन वेळा एक-एक धावेने विजय मिळवला आहे. आता आफ्रिकने भारताशी बरोबरी केली आहे.

T20 World Cup 2024 : यंदाच्या टी 20 विश्वचषकात अनेक उलटफेर होत (T20 World Cup 2024) आहेत. पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेने पाकिस्तानचा (USA vs PAK) पराभव केला होता. अफगाणिस्तानने सुद्धा न्यूझीलंडला (AFG vs NZ) धूळ चारली. काल तर नेपाळने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघाला (SA vs Nepal) चांगलाच घाम फोडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात आफ्रिकेने फक्त एक रनने रडतखडत विजय मिळवला. नेपाळच्या संघाने जबरदस्त टक्कर दिल्याने आफ्रिकेचा हा विजय (South Africa) झाकोळला गेला. टी 20 विश्वचषकात एक रनने विजयी होण्याची ही दक्षिण आफ्रिकेची दुसरी वेळ आहे.

टीम इंडिया देखील यामध्ये (Team India) मागे नाही. भारतीय संघाने दोन वेळा एक-एक धावेने विजय मिळवला आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात फक्त चार संघ असे आहेत ज्यांनी एक धावेने प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, भारत, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेने सर्वात आधी सन 2009 मध्ये न्यूझीलंड आणि आता 2024 मध्ये नेपाळ या संघांना फक्त एक रनने पराभूत केले.

जिंकता जिंकता हरला नेपाळ! फक्त एक रन कमी पडला अन् सामना आफ्रिकेने हिरावला

झिम्बाब्वेने सन 2022 मध्ये पाकिस्तान विरुद्ध तर न्यूझीलंडने 2010 मध्ये पाकिस्तान विरुद्ध एका धावेने विजय मिळवला होता. भारतीय संघानेही टी 20 वर्ल्डकपमध्ये दोन वेळेस प्रतिस्पर्धी संघांना एक धावेने पराभूत केले आहे. सन 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर एका धावेने विजय मिळवला होता. तसेच 2016 मध्ये बंगळुरूत बांगलादेश विरुद्ध एक रनने विजय मिळवला होता. आता दक्षिण आफ्रिकेने नेपाळवर विजय मिळवून भारताशी बरोबरी केली आहे.

जिंकता जिंकता हरला नेपाळ

विश्वचषकातील 34 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात खेळवला गेला. हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली. परंतु, त्यांचा हा विजय नेपाळ संघातील खेळाडूंच्या कामगिरीने झाकोळला गेला. अखेरच्या चेंडूवर नेपाळला जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची गरज होती. यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांनी एक विकेट घेत एका धावेने सामना जिंकला.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने 20 ओव्हर्समध्ये 115 धावा केल्या. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीवीर रेजा हेन्ड्रिक्स 43 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अन्य एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.

follow us