Paris Olympics 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिंपिक (Paris Olymipcs 2024) स्पर्धांना सुरुवात झाली आहे. विविध देशांचे खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. खेळाडू विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखवणार आहेत. या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकार आहेत पण क्रिकेट (Cricket News) नाही. कधीकाळी ऑलिंपिकमध्येही क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. आता ही गोष्ट तुम्हाला कदाचित खरी वाटणार नाही पण हे खरं आहे. आजपासून बरोबर 124 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी सुद्धा फ्रान्सच्याच पॅरिस शहरात ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्यांदा क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला होता. तो सामना ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात ब्रिटनच्या संघाने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले होते.
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्या आहेत. सुरुवतीलाच चीनने (China) सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दहा मीटर एअर रायफल प्रकारात चिनी खेळाडूंनी दक्षिण कोरियाच्या (South Korea) खेळाडूना हरवून गोल्ड मेडल मिळवले. यावेळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये एकूण 32 क्रीडा प्रकार होणार आहेत. यामध्ये शुटिंगपासून हॉकीपर्यंतच्या (Hockey) खेळांचा समावेश आहे. पण यामध्ये क्रिकेट नाही.
ऑलिम्पिक्ससाठी भारत सज्ज! भारतीय खेळाडूंच्या आजच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
क्रिकेट हा असा खेळ आहे जो भारतात खूप लोकप्रिय आहे. अन्य कोणत्याही खेळापेक्षा क्रिकेटची क्रेझ सर्वाधिक आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्टइंडिज, न्युझीलंड या देशांतही क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. आता नेपाळ आणि अमेरिकाही क्रिकेटमध्ये सहभागी झाले आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा क्रिकेट ऑलिम्पिकचा हिस्सा नाही. आता असे सांगितले जात आहे की पुढील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कदाचित क्रिकेटचा समावेश होऊ शकतो.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ऑलिंपिक स्पर्धांमध्ये 124 वर्षांपूर्वी क्रिकेट होते. पहिली ऑलिंपिक स्पर्धा 1896 मध्ये अथेन्स शहरात भरवण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या ऑलिंपिक स्पर्धा सन 1900 मध्ये फ्रान्सच्या पॅरिस (France) शहरात झाल्या होत्या. त्यावेळी पहिल्यांदा क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला होता. ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियम या देशांनी क्रिकेट संघ पाठवण्यासाठी सहमती दर्शविली होती. पण नंतर स्पर्धांचे यजमानपद मिळाले नाही म्हणून नेदरलँड आणि बेल्जियम नाराज झाले होते. या कारणामुळे दोन्ही देशांनी आपापले क्रिकेट संघ पाठवले नव्हते.
चक दे इंडिया! विश्वविजेत्या जर्मनीला भारताने चारली पराभवाची धूळ
यानंतर ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात (Britain vs France) पहिला आणि अंतिम क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यात ब्रिटनच्या संघाने विजय मिळवला होता. तसं पाहिलं तर हा सामना एकतर्फीच होता. या सामन्यात फ्रान्सला काहीच करता आले नाही. या सामन्यात विजेत्या ब्रिटन संघाला सुवर्णपदक आणि फ्रान्स संघाला सिल्व्हर मेडल मिळाले होते.
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी 12-12 खेळाडूंचा समावेश होता. हा एक कसोटी सामना होता जो दोन दिवस चालला. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ब्रिटनने एकूण 117 रन केले होते. यानंतर फ्रान्सला फक्त 78 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात 5 विकेट गमावत ब्रिटनने 145 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ फक्त 26 धावांत ऑल आऊट झाला. ब्रिटनने हा सामना 158 धावांनी जिंकला.
आता ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. सन 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तुम्ही खेळाडूंना क्रिकेट खेळताना पाहू शकाल. या स्पर्धांमध्ये कसोटी किंवा वनडे नाही तर टी 20 क्रिकेट सामने होतील अशी दाट शक्यता आहे.