मुंबई : ऑलिम्पिक 2036 च्या आयोजनाची भारताला संधी मिळाल्यास कुठलीही कसर सोडणार नाही, कारण हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताची दावेदारी जाहीरपणे सादर केली आहे. ते मुंबईत ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही, मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यामुळे भारत उत्सुक असल्याच स्पष्ट झालं आहे. (Prime Minister Narendra Modi publicly presented India’s bid for the 2036 Olympics for the first time)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी १४० कोटी भारतीयांच्या भावना तुमच्यासमोर मांडू इच्छितो. 2036 ऑलिम्पिक आपल्या भूमीवर आयोजित करण्याच्या प्रयत्नात भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आणि आकांक्षा आहे. तुमच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. याआधी 2029 मध्ये होणाऱ्या युवा ऑलिम्पिकचे यजमानपदासाठीही भारत उत्सुक आहे.
“मला विश्वास आहे की भारताला आयओसीचा सतत पाठिंबा मिळत राहील. भारत मोठ्या प्रमाणावर जागतिक कार्यक्रम आयोजित करण्यास तयार आहे. G20 च्या यजमानपदाच्या वेळी जगाने हे पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे 141 वे सत्र भारतात होणे खूप खास आहे. 40 वर्षांनंतर आयओसीचे सत्र भारतात होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले.
गेल्या काही वर्षांत भारताने सर्व प्रकारच्या जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आम्ही अलीकडेच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते, यात जगातील 186 देशांनी भाग घेतला होता. आम्ही महिला फुटबॉल अंडर-17 विश्वचषक, पुरुष हॉकी विश्वचषक, नेमबाजी विश्वचषक स्पर्धाही आयोजित केल्या आहेत.
भारत दरवर्षी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग (आयपीएल) पैकी एक आयोजित करतो. सध्या भारतातही क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात, IOC कार्यकारी मंडळाने 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला, आम्हाला लवकरच याबाबत सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील अशी आशा आहे, अशीही भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
भारताच्या प्राचीन क्रीडा परंपरेचा संदर्भ देत ते म्हणाले, ”भारतातील खेळ हा आपल्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यात प्रत्येक उत्सव खेळाशिवाय अपूर्ण आहे. आपण भारतीय केवळ क्रीडाप्रेमी नाही तर आपण खेळ जगणारे लोक आहोत आणि हे आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात दिसून येते. सिंधू संस्कृती असो, हजारो वर्षांपूर्वीचा वैदिक काळ असो, प्रत्येक कालखंडात भारताचा क्रीडा वारसा समृद्ध आहे. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आपल्या ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, चौसष्ट विषयांमध्ये प्राविण्य आहे, त्यापैकी अनेक विषय घोडेस्वारी, धनुर्विद्या, पोहणे, कुस्ती इत्यादी खेळांशी संबंधित आहेत.
खेळात कोणीही हरत नाही. खेळ खेळात फक्त विजेते आणि शिकणारे असतात. खेळाची भाषा आणि आत्मा सार्वत्रिक आहे. खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नसून तो मानवतेला स्वतःचा विस्तार करण्याची संधी देतो. जो विक्रम मोडतो, संपूर्ण जग त्याचे स्वागत करते. खेळांमुळे आपली ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भावनाही दृढ होते. त्यामुळेच आपले सरकार प्रत्येक स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया हिवाळी गेम्स आणि लवकरच आयोजित केल्या जाणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स ही त्याची उदाहरणे आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.