World Cup 2023 : पाकिस्तानचा दारुण पराभव, नरेंद्र मोदींनी केलं रोहित आर्मीचे अभिनंदन
IND vs PAK : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोहित शर्माची बॅट अशी तळपली की पाकिस्तानी गोलंदाजीची पळता भुई थोडी झाली. या उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवला. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की पाकिस्तानविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयासाठी मी टीम इंडिया आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. भारताने अतिशय नेत्रदीपक विजय मिळवला आहे. खेळ हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यात गेलात तर प्रत्येक सण खेळाशिवाय अपूर्ण असल्याचे लक्षात येईल. आम्ही भारतीय केवळ क्रीडाप्रेमी नाही तर खेळासोबत जगतो आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी उत्सुक
मोदी म्हणाले, “आम्ही देशात ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी भारत उत्साहित आहे. 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्याच्या प्रयत्नात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, हे 140 कोटी भारतीयांचे जुने स्वप्न आहे. आम्ही युवा ऑलिम्पिक आयोजित करण्यासही उत्सुक आहोत. भारताला IOC चा पाठिंबा मिळत राहील असा आम्हाला विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 2029 मध्ये भारत युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
पाकिस्तानचे कंबरडे मोडले अन् बुमराहची टॉप गोलंदाजांच्या लिस्टमध्ये धडक
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस
आपल्या संबोधनात पंतप्रधान म्हणाले, “आयओसी कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस केल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला आहे. आशा आहे की लवकरच आम्हाला या संदर्भात काही सकारात्मक बातमी मिळेल.”
शहीद अग्निवीराला ‘गार्ड ऑफ ऑनर’ का दिला नाही? आर्मीने सांगितले कारण
दरम्यान, वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 191 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात 192 धावांचे लक्ष्य भारताने 30. 3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची मोठी खेळी केली आहे. तर श्रेयस अय्यर नाबाद 53 धावा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.