R Ashwin Birthday Special : भारतीय क्रिकेटचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. अश्विन आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनने कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी केली हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचे वडील क्लब क्रिकेटर होते आणि वेगवान गोलंदाजी करायचे.
इंजिनीअरिंग सोडलं आणि क्रिकेटर झाला
अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या मैलापूर प्रांतात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते आणि ते वेगवान गोलंदाजी करायचे. अश्विन अभ्यासात चांगला होता. चेन्नईतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांने एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून माहिती तंत्रज्ञान (आयटी) मध्ये पदवी प्राप्त केली आहे. मात्र, नंतर त्यांने अभियांत्रिकी सोडून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा विचार केला आणि तो जागतिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झाला.
ओपनिंग, मध्यम गती आणि नंतर फिरकी
क्रिकेट चाहते आणि सहकारी खेळाडूंमध्ये ‘अॅश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सलामीवीर म्हणून कारकिर्दीची सुरु केली. सलामीवीर आणि मध्यमगती गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अश्विनला त्याचे बालपणीचे प्रशिक्षक सीके विजय यांनी ऑफ-स्पिनर बनण्याचा सल्ला दिला. अश्विनची उंची 6 फूट 2 इंच आहे आणि हे लक्षात घेऊन विजय यांनी त्याला ऑफ स्पिनचा सल्ला दिला. दुसरे कारण म्हणजे अश्विन 16 वर्षाखालील क्रिकेटच्या एका सामन्यादरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर त्याला धावण्यास अडचण येत असल्याने फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला देण्यात आला.
पहिल्याच सामन्यात 6 विकेट्स
अश्विन 2006 मध्ये हरियाणाविरुद्ध कारकिर्दीतील पहिला सामना खेळला आणि अप्रतिम कामगिरी केली. अश्विनने त्या सामन्यात 6 विकेट घेतल्या आणि त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची चांगली सुरुवात केली. 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याने 2 बळी घेतले. अश्विनने आतापर्यंत 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 विकेट्स आणि 94 कसोटीत 489 बळी घेतले आहेत. याशिवाय 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 72 विकेट आहेत.
पदार्पणातच 9 विकेट्स
रविचंद्रन अश्विनने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने एकूण 9 बळी घेतले. अश्विनने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.
PM Narendra Modi B’day : पंचाहात्तरीच्या उंबरठ्यावर पोहचलेले मोदी राजकारणातून निवृत्त होणार?
शतक आणि 5 विकेट
चेन्नईचा रहिवासी रविचंद्रन अश्विन हा कसोटीत 5 बळी घेणारा आणि शतक करणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेत 103 धावा करून ही कामगिरी केली होती. अश्विनने कसोटीत 34 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.