नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesh Mukherjee) यांच्या नात्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. दिल्लीतील पटियाला हाउस फॅमिली कोर्टाने शिखर धवनचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटाला मंजूरी देताना आयशाने शिखर धवनचा मानसिक छळ केल्याचेही कोर्टाने मान्य केले आहे. ( Indian Cricketer Shikhar Dhawan Divorce With Wife Ayesha Mukherjee)
शिखर धवन आणि आयशा यांनी 2021 मध्ये लग्न केले होते. दोन वर्षांनंतर त्यांना जोरावर नावाचा मुलगा झाला. सुरुवातीला दोघांमध्ये खूप प्रेम होते पण हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. शिखर धवन आणि आयेशाची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली. या दोघांना अधिक जवळ आणण्याचे काम टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग याने केले. आयशा शिखर धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. मात्र प्रेमात वयाची अट नसते हे यो दोघांनी लग्नबंधनात अडकत सिद्ध केले. मात्र, कालांतराने दोघांमधील वाद विकोपाला जात प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले.
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांची 2009 मध्ये एंगेजमेंट झाली त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. आयशा मुखर्जीचे हे दुसरे लग्न होते. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यानंतर शिखरसोबत लग्ननंतर आयेशाने 2014 मध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. आयेशा मुखर्जीचा जन्म भारतात झाला असून, नंतर ऑस्ट्रेलियात राहायला गेली. आयेशाचे पेशाने किकबॉक्सर आहे. तिचे वडील बंगाली तर आई ब्रिटनची आहे.
दिल्लीत जन्मलेल्या शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द शानदार राहिली आहे. शिखरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 17 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. 2022 मध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चट्टोग्राम येथे त्याने बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. हा त्याचा भारतासाठी शेवटचा सामना होता आणि तेव्हापासून तो टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. धवनने भारतासाठी 167 एकदिवसीय, 34 कसोटी आणि 67 टी-20 सामने खेळले आहेत.