The Hundred 2026 : लवकरच इंग्लंडमध्ये द हंड्रेड 2026 ची सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या स्पर्धेतील 4 संघ मालकांनी पाकिस्तानी खेळाडू न खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयपीएलनंतर आता द हंड्रेड 2026 मध्ये देखील पाकिस्तानी खेळाडू दिसणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. द हंड्रेड 2026 मधील चार संघ भारतीयांच्या मालकीचे आहेत. या चार संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मँचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, सदर्न ब्रेव्हज आणि सनरायझर्स लीड्सचे भारतीय मालक आहेत, ज्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. द हंड्रेड (The Hundred 2026) लिलाव दोन दिवस चालेल. महिला खेळाडूंसाठी बोली 11 मार्च रोजी आणि पुरुष खेळाडूंसाठी 12 मार्च रोजी लागणार आहे. हा लिलाव इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये होईल. जगभरातील सुमारे 1000 खेळाडू लिलावात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
एका वरिष्ठ ईसीबी अधिकाऱ्याने खेळाडू एजंटशी अनौपचारिकपणे बोलताना सांगितले की, चारही आयपीएल (IPL) फ्रँचायझी पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी बोली लावणार नाहीत. भारतीय गुंतवणुकीनंतर पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली जाईल का, असा प्रश्न ईसीबीचे कार्यकारी अध्यक्ष रिचर्ड गोल्ड यांना यापूर्वी विचारण्यात आला होता. त्यांनी सांगितले की कोणत्याही खेळाडूशी भेदभाव केला जाणार नाही. मोहम्मद अमीर, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि हरिस रौफ यांसारखे स्टार खेळाडू द हंड्रेड लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
भिगवण प्रकरणात ट्विस्ट; अचानक तरुणी पोलीस ठाण्यात हजर; सांगितलं अहिल्यानगर कनेक्शन
भारत आणि पाकिस्तानमधील वाद
एप्रिल 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान राजकीय संबंध बिघडल्याने दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला असून टी20 विश्वचषकात देखील हा वाद सुरूच आहे.
