Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फार्मात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करत पहिल्या दोन्ही सामन्यात शतक झळकावले आहे. पहिल्या सामन्यात विराटने 135 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात त्याने 102 धावा करत 53 वे एकदिवसीय शतक झळकावले. तर गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र यावर विराट कोहलीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिल्ली क्रिकेट बोर्डला देण्यात येत नव्हती. तर आता विजय हजारे ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असणार असल्याची माहिती दिल्ली क्रिकेट बोर्डला दिली आहे.
तर दुसरीकडे सुरुवातीला विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खेळण्यास नकार देत होता मात्र बीसीसीआय (BCCI) नाराज झाल्याने त्याने आपला निर्णय बदलला आणि या स्पर्धेत खेळण्यास तयार झाला असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यानंतर विरोट कोहलीने फिटनेसवर वक्तव्य करत मी कधीही जास्त तयारीवर विश्वास ठेवणारा नाही. माझे संपूर्ण क्रिकेट मानसिक आहे. जोपर्यंत मी मानसिकदृष्ट्या मजबूत आहे तोपर्यंत मी खेळू शकतो असं म्हटलं होते. तसेच मी 300 एकदिवसीयय सामने खेळलो आहे आणि गेल्या 15-16 वर्षांपासून बरेच क्रिकेट खेळत आहे. जर तुम्ही ब्रेक न घेता दीड किंवा दोन तास नेटमध्ये खेळू शकत असाल तर तुम्ही प्रत्येक गरज पूर्ण करत आहात असं देखील विराटने म्हटले आहे. मात्र विराट कोहलीच्या या वक्तव्यावर बीसीसीआय नाराज झाल्याने आता विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
विश्वचषक 2027 च्या तयारीचा भागसाठी बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्माला देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सांगितले होते. यानंतर रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल मुंबई क्रिकेटला माहिती दिली होती मात्र विराट कोहली या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत विराटने कोणतीही माहिती दिल्ली क्रिकेटला दिली नव्हती मात्र आता त्याने विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीकडून खेळणार असल्याची माहिती दिल्ली क्रिकेट बोर्डला दिली आहे. दिल्ली विजय हजारे ट्रॉफीमध्ये 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
