Maharashtra Government From SIT For MAnoj Jarange Patil : राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले होते. भाजप-शिवसेना युतीचे 48 पैकी 42 खासदार निवडून आल्याने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. त्यानंतर सहाच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार होती. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले, शिवसेना-भाजपची भक्कम युती, फडणवीस यांच्या दमदार आत्मविश्वास असे सारे विधानसभा निवडणुकीसाठी जमून आले होते. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तर, नैराश्यात होते. त्यातील अनेकांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला होता. फडणवीसांनी शरद पवारांनाही (Sharad Pawar) कोंडीत पकडले होते. 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी हा पक्ष संपलेला असेल, असेच वातावरण होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राज्य पिंजून काढत होती. सारे पोल भाजपच्या बाजूने येत होते. फडणवीस हे पवारांपेक्षाही मोठे नेते झाल्याचा फिल भाजपच्या कार्यकर्त्यांना येत होता.
मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?
अन् पवारांनी भाजपचा डाव मोडायचे ठरवेले
फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असतानाच मुंबईतून एक बातमी आली. शरद पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ED ने राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची. या बातमीनंतर तर काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना चक्कर येणेच बाकी होते. पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने फडणवीस यांनी दोन्ही काॅंग्रेसला पूर्णतः नेस्तनाबूत केल्याचे भाजपला वाटू लागले. येथेच सारी चूक झाली. काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले होते. पण पवारांवर गुन्हा दाखल होणे हा त्यांच्यासाठीही धक्का होता. पण कसलेल्या पवारांनी भाजपचा हा डाव मोडायचे ठरवले. त्यासाठी स्वतःहून ईडीच्या चौकशीला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी व्यस्त राहणार असल्याने माझी आताच चौकशी करा, असा आग्रह त्यांनी धरला. चौकशीची तारीखही त्यांनी ईडीला कळवली आणि येथेच डाव उलटला. ईडीला म्हणजे प्रत्यक्षात सत्ताधारी भाजपला माघार घ्यावी लागली. प्रचंड सहानुभूतीची लाट पवारांच्या बाजूने आली.
ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने फडणवीस हे मराठा नेत्याला नामोहरम करत असल्याचा संदेश राष्ट्रवादीने मग लोकांपर्यंत नेला. मराठाबहुल मतदारसंघात याची प्रतिक्रिया उमटली. भाजप आणि शिवसेनेचे सुरक्षित मतदारसंघ धोक्यात आले. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला नसता तर, राष्ट्रवादीचा खेळ 20 ते 25 आमदारांवर आटोपणार होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या 54 जागा निवडून आल्या. काॅंग्रेसलाही संजीवनी मिळाली आणि त्यांचे 42 आमदार निवडून आले. मराठा नेत्याला डिवचण्याचा परिणाम पुढे मग सत्तांतरात झाला. शिवसेनेला सोबतीला घेऊन पवारांनी फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न उध्वस्त केले.
अरे हो की बाबा झाली चूक, हा दिवटा असा…; घोडगंगावरून अजितदादांनी घेतला अशोक पवारांचा समाचार
जरांगेंच्या पाठीमागे पवारांचा हात…
हे सारे का सांगितले? देवेंद्र फडणवीस हे पुन्हा तीच चूक करत तर नाहीत ना? एकनाथ शिंदे, अजित पवार हे सोबत असताना भाजपसाठी लोकसभेची निवडणूक राज्यात सोपी मानली जात आहे. परंतु, अनेक सर्व्हेमधून भाजप आघाडीला 30 जागा मिळतील, असेच दाखविले जात आहे. त्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय भाजपने चिघळला जाईल, अशी रणनीती आखली आहे. जरांगे यांच्यामागे पवार आहेत, हे दाखवून देऊन हे आंदोलन निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे. या मागे ओबीसी मते एकगठ्ठा भाजप आघाडीला मिळावीत, असेही धोरण आहे.
जरांगेंच्या चौकशीचा भाजपला फटका
यात मोठा धोका भाजप घेत आहे, असे जाणकरांचे म्हणणे आहे. मराठा आरक्षणाचा विषय सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन मिटविल्याचा सरकारचा दावा आहे. पण जरांगेंना उघडे करण्याच्या नादात मराठा मतांना नख तर लागणार नाही ना, याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. मनोज जरांगे किंवा आंदोलनातील इतर नेत्यांची चौकशी सुरू झाली तर, त्याचे वेगळे परिणाम मराठा बहुल मतदारसंघात होऊ शकतात, हे कोणी नाकारू शकत नाही. जरांगे यांचा प्रभाव मराठवाड्यात आहे. त्यातही बीड आणि जालना या दोन मतदारसंघात त्यांचे म्हणणे महत्वाचे ठरू शकते. पण प्रत्यक्षात चौकशी सुरू झाली तर, त्याची सहानुभूती जरांगेंना मिळू शकते. याचा फटका फडणवीस यांच्या प्रतिमेला बसू शकतो.
माझ्या घरावर तेराच पत्रे, आता ते काढून नेता? ‘एसआटी’वरुन मनोज जरांगेंचा खोचक सवाल
जरांगेंच्या निशाण्यावर फक्त फडणवीसचं…
जरांगे यांनी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या मराठा नेत्यांवर टीका केली नाही. फक्त फडणवीस यांनाच टार्गेट केले. यातून जरांगे यांनी त्यांचा विरोधी नेता कोण, हे सांगितले आहे. यातून फडणवीस हेच त्यांचे लक्ष्य राहणार आहे. मराठा मतांचे कन्साॅलिडेशन (एकत्रिकरण) करण्याचा जरांगे यांचाही प्रयत्न दिसतो आहे. महाराष्ट्रात 150 हून अधिक विधानसभा मतदारसंघात मराठा समाज हा प्रबळ आहे. इतर मतदारसंघातही त्याचे अस्तित्व आहे. जरांगे यांच्यामागे राजकीय शक्ती असतील, असा फडणवीस यांचा आरोप आहे. तसे असेल तर, जरांगे यांच्या निमित्ताने मराठा समाज भाजपवर नाराज होईल, अशीही रणनीती यामागे असेल, हे भाजपच्या लक्षात येत नाही का? शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला टार्गेट केल्याची मोठी किंमत भाजपला 2019 मध्ये मोजावी लागली. आता तर जरांगे यांच्या निमित्ताने मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यात जरांगेंची चौकशी किंवा त्यांना तुरुंगात टाकणे हा प्रकार म्हणजे इंग्रजीत म्हणतात तसे ब्लंडर म्हणजे घोडचूक ठरेल. त्यामुळेच भाजपचे नेते जरांगेंना केवळ दम देणार की, त्यांच्यावर खरोखरीच कायदेशीर कारवाई करणार, हे आगामी काळात पाहायला मिळेल.