Download App

नळदुर्गचा विकास ते स्वतंत्र तालुक्याची निर्मिती, राणा जगजितसिंह पाटलांनी सांगितलं विकासाचं व्हिजन

आगामी काळातही तुळजापूर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार आहे, अशी ग्वाही राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.

  • Written By: Last Updated:

Rana Jagjitsingh Patil : आज विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) प्रचाराचा शेवटचा दिवस असून महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. प्रचारफेरी आणि पदयात्रेच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहे. नळदुर्ग एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मतदारसंघात अनेक विकासकामे केली. आगामी काळातही तुळजापूर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार आहे, अशी ग्वाही राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.

Tuljapur Vidhansabha : राणा जगजितसिंह पाटील कोणत्या मुद्द्यांवर मते मागतायेत? 

ऐतिहासिक नळदुर्गला विकसित पर्यटनस्थळाचे केंद्र करणार आहे. तसेच स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेनेही महत्वपूर्ण पाऊल टाकणार असल्याचं राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

नळदुर्ग विकसित केलाय…
ते म्हणाले, निजाम काळात जिल्हा मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहराला मधल्या काळात बकालपण आले होते. जाणीवपूर्वक नळदुर्ग एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेल्या नळदुर्गचा लौकीक आता राज्य नव्हे, तर देश पातळीवर पोहोचला आहे. राज्यातील पहिली बसवसृष्टी, वसंतराव नाईक यांचे स्मारक आणि स्वतंत्र भारतातील पहिले अशोकचक्र विजेते शहिद बचित्तरसिंह यांचे भव्य स्मारक, अशा वेगवेगळ्या प्रकल्पातून येणाऱ्या काळात एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून नळदुर्गचा लौकिक ठळकपणे राज्याच्या नकाशावर कोरला जाणार आहे.

वेगवेगळ्या प्रकल्पांतून 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती; आमदार राणा जगजितसिंह पाटील 

बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारणार..
पुढं ते म्हणाले, पर्यटन क्षेत्र म्हणून तुळजापूर आणि नळदुर्ग ही ऐतिहासिक शहरे विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक होते. त्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न केले. राज्यातील पहिली भव्य बसवसृष्टी नळदुर्ग येथे साकारणार आहे. त्यासाठी सोलापूर-हैद्राबाद-राष्ट्रीय महामार्गालगत पाच एकर जागा उपलब्ध करून घेतली आहे. त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा, साऊंड अ‍ॅन्ड लाईट शो, तसेच प्रशस्त ध्यानकेंद्रासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांचेही भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. त्यासाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितले.

निजामाच्या जोखडातून आणि रझाकारांच्या अमानवी छळातून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी मोठे शौर्य गाजवून हौतात्म्य पत्करलेले हवालदार बचित्तरसिंह यांचेही स्मारक ७५ वर्षानंतर नळदुर्गच्या शौर्यभूमित उभारले जात आहे. त्या ठिकाणी ज्ञात-अज्ञात हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिंनाही उजाळा मिळणार असल्याचं राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

ऐतिहासिक नळुदर्गच्या पुढील ३० वर्षांची गरज लक्षात घेवून ४८ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. तर शहरातील डीपी रस्ते, नाली व इतर विकासकामांसाठी १५० कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. स्वतंत्र तालुका निर्मितीची ५० वर्षांपासूनच्या मागणीला आपण आकार दिला आहे. नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे तालुका निर्मितीचा एक महत्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. मुस्लिम समाजबांधवांसाठी २ कोटी रूपयांच्या निधीतून शादीखाना उभारणीचे काम सुरू आहे. तर राष्ट्रीय महामार्गालगत ट्रामाकेअर सेंटरला मंजुरी मिळाल्याने भीषण अपघातातील व्यक्तींना वेळेत उपचार मिळून जीवितहानी टळण्यास मदत होणार आहे.

कुरनूर प्रकल्पासाठी २९ कोटींचा निधी
गेल्या ५५ वर्षांपासून दुरूस्तीअभावी रखडलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी २९ कोटी रूपयांचा निधी उपलबध झाला आहे. कामाची निविदाही जाहीर झाली असून त्यामुळे १० गावांतील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नळदुर्ग, होर्टी येथे एमआयडीसी उभारून त्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरूणांच्या हाताला हक्काचा रोजगार देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नळदुर्ग येथे कृषी उत्पन्न बाजार समिती होण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. पुढील कार्यवाही देखील लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले.

follow us