वेगवेगळ्या प्रकल्पांतून 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती; आमदार राणा जगजितसिंह पाटील
धाराशिव : विकासाची दृष्टि ठेवून व्यापक लोकहितासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे ही आपल्या कामाची पध्दत आहे. तत्कालीन ठाकरे सरकारमुळे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोकहिताच्या प्रकल्प आणि योजनांना मोठी खीळ बसली होती. मागील 24 महिन्यांच्या कालावधीत सतत पाठपुरावा करून जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या, पुढील काळात 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मितीचे आपले उद्दिष्ट आता पूर्णत्वास आल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajgajit Singh Patil) यांनी सांगितले.
तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हाच टायगर करणार, सुजय विखेंचा थोरातांना इशारा
तुळजापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या युवकांच्या मेळाव्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुतीच्या कार्यकाळात तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक जनहितांच्या प्रकल्प आणि योजनांची माहिती दिली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला वैश्विक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण स्वप्न पाहिले. त्याचा पाठपुरावा केला. केंद्रातील आपले सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने त्याला पाठबळ दिले आणि आता दोन हजार कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला आहे. तुळजापूर शहरात राज्य, देश आणि जगभरातून आलेल्या दहा हजाराहून अधिक पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं पाटील म्हणाले.
तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हाच टायगर करणार, सुजय विखेंचा थोरातांना इशारा
मुक्कामी आलेल्या भाविकांची संख्या वाढल्यानंतर होणारी आर्थिक उलाढाल तुळजापूर शहर आणि परिसराच्या अर्थकारणाला मोठी गती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
14 हजार हेक्टर ओलिताखाली येणार
पुढं राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपण बाळगले आहे. त्यामुळे दळणवळणाची सक्षम यंत्रणा उपलब्ध होईल आणि त्यातूनही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे. तुळजापूर शहर एक संपन्न आणि समृध्द शहर म्हणून पुढील काळात देशातील नकाशावर आल्याखेरीज राहणार नाही. त्यादिशेने सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांना आता आकार आला आहे. आपल्या हक्काचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचे पाणी डिसेंबरअखेरपर्यंत तुळजाभवानी देवीच्या चरणी दाखल होत आहे. त्यातून 14 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतीशी निगडीत रोजगार आणि अर्थकारणालाही मोठे बळ मिळणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी विस्थापित होणार्या तरूणांना आपल्या गावातच चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील कौशल्य असलेल्या तरूणांना जिल्ह्यातच काम मिळावे, यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता यश आले. पर्यटन विकास, नवीन रेल्वेमार्ग, तामलवाडी एमआयडीसी आणि कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून पुढील काळात 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मितीचे आपले उद्दिष्ट आता नजरेच्या टप्प्यात आल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं.
370 एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारणार…
तामलवाडी येथे 370 एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यातील 150 पेक्षा अधिक उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दाखवली आहे. या एमआयडीसीत 12 हजार नोकर्या तयार होणार आहेत. त्याचबरोबर अप्रत्यक्ष रोजगाराची संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. कौडगाव येथे दीड हजार एकरावर एमआयडीसी निर्माण करण्याचे आपण पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकारू लागले आहे. महाजनकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी 50 मेगावॅट प्रकल्पाचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वितही झाला आहे, असं ते म्हणाले.
10 हजाराहून अधिक युवकांच्या हाताला काम
2019 साली महाजनादेश यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव येथे राज्यातील पहिली टेक्निकल टेक्सटाईल पार्क जाहीर केली होती. मात्र त्यानंतर ठाकरे सरकारने त्यासाठी काहीच केले नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपण त्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून टेक्निकल टेक्सटाईल पार्क कौडगाव येथेच उभारणार असल्याचे सभागृहात आपण उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 24 कोटींच्या निधीला मंजुरीही मिळाली आहे. या प्रकल्पामुळे 10 हजाराहून अधिक युवकांच्या हाताला काम मिळणार आहे, असं पाटील म्हणाले.
कौडगाव, तामलवाडी, तुळजापूर, नवीन रेल्वेमार्ग यासह कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या 35 हजाराहून अधिक संधी उपलब्ध होत आहेत. विकासाची दृष्टि ठेवून लोकहिताच्या कृतीने केलेल्या प्रयत्नांना महायुती सरकारने मोठे बळ दिले. त्यामुळे जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले हे सगळे प्रकल्प आणि योजना आता मोठ्या वेगात पूर्णत्वाकडे जात असल्याने त्याचे मोठे समाधान आहे. आपल्या जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हाती घेतलेले प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत आणि उर्वरित प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सोबतीची आवश्यकता असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.