proposal to remove reservation of Mumbai’s Alexandra cinema hall : बदलते मनोरंजनाचे स्वरूप, प्रेक्षकांच्या बदललेल्या पसंती आणि वाढता आर्थिक खर्च यामुळे मुंबईतील जुन्या चित्रपटगृहांची ओळख हळूहळू संपुष्टात येत आहे. आता भायखळा-नागपाडा परिसरातील तब्बल दोन दशकांपासून बंद असलेले ‘अलेक्झांड्रा सिनेमा’ देखील कायमचे इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. 2007 पासून बंद असलेल्या या चित्रपटगृहाच्या 1,005 चौरस मीटर भूखंडावरील ‘सिनेमागृह’ हे आरक्षण हटवून जागा निवासी वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सुधार समितीसमोर मांडण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
दोन दशकांपासून सिनेमागृह बंद
भायखळ्यातील अलेक्झांड्रा सिनेमा एकेकाळी इंग्रजी चित्रपट आणि विशेषतः हॉलीवूडच्या अॅक्शनपटांच्या प्रदर्शनासाठी ओळखला जात होता. मात्र, मल्टिप्लेक्स संस्कृतीचा वाढता प्रभाव, प्रेक्षकांच्या आवडीनिवडीतील बदल आणि चित्रपटगृह चालवण्याचा वाढता खर्च यामुळे या सिंगल-स्क्रीन सिनेमाला आपले अस्तित्व टिकवता आले नाही.
“धडपड” सिनेमातून ग्रामीण कुटुंबातील नातेसंबंध आणि संघर्ष रुपेरी पडद्यावर उलगडणार
2007 मध्ये चित्रपटगृह बंद झाल्यानंतर ही जागा बराच काळ वापराविना पडून आहे. दीर्घकाळ देखभाल न झाल्यामुळे इमारतीची अवस्थाही खराब झाली असून संरचनेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्याच्या विकास आराखड्यात या भूखंडासाठी ‘सिनेमागृह’ असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, जागेच्या वापरात बदल करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे आरक्षण काढून टाकून भूखंड निवासी वापरासाठी खुला करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वित्तीय शिस्तीवर भर; सरकारी वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या ठिकाणी निवासी प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे अनेक दशकांपासून चित्रपटगृहाशी जोडलेली या जागेची ओळखही संपणार आहे.महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी समीर गुलामनबी काझी यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अलेक्झांड्रा सिनेमासाठी असलेले आरक्षण हटवण्याची मागणी केली होती.
यानंतर या भूखंडाचे भोगवटाधारक रफीक पटेल यांनी २७ मार्च २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाकडे जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी अर्ज केला. नगरविकास विभागाच्या निर्देशानंतर महापालिकेने ६ एप्रिल २०२६ रोजी आयुक्तांची पूर्वपरवानगी घेऊन यासंदर्भातील अहवाल आणि शिफारसी तयार केल्या.आता सुधार समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. समितीची मंजुरी मिळाल्यास भूखंडाच्या निवासी विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो.
मुंबईतील जुन्या चित्रपटगृहांचे आरक्षण बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. वरळीतील प्रसिद्ध ‘सत्यम’ चित्रपटगृहाचे आरक्षणही काही वर्षांपूर्वी बदलण्यात आले होते. ‘सत्यम’, ‘सचिनम’ आणि ‘सुंदरम’ अशा तीन चित्रपटगृहांचा समावेश असलेले हे संकुल दीर्घकाळ बंद राहिल्यानंतर त्याच्या जमिनीच्या वापराबाबत बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संबंधित संस्थेने महापालिकेकडे आरक्षणात बदल करण्याची मागणी केली होती.
अमावस्येला सूर्यग्रहण, या 6 राशींना पैसा आणि करिअरमध्ये खूप काळजी घ्यावी लागेल
त्यानंतर महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम अर्थात एमआरटीपी कायद्यानुसार आरक्षण बदलासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध केली होती.मुंबईतील सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहांची संख्या आधीच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत अलेक्झांड्रा सिनेमाचे आरक्षण बदलण्याचा निर्णय झाल्यास शहराच्या जुन्या चित्रपट संस्कृतीतील आणखी एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात येणार आहे.
