मुंबईत पहाटे भरधाव बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात, कारचा चुराडा, तिघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

कोस्टल रोडवरील लाला लजपतराय कॉलेजसमोर आणि लोटस जेटीजवळ आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Horrific Accident Involving A Speeding BMW

Horrific accident involving a speeding BMW : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील आलिशान बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर झालेल्या या दुर्घटनेत तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की बीएमडब्ल्यू कारचा अक्षरशः चुराडा झाला. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हकडून हाजीअलीच्या दिशेने जात होती. कोस्टल रोडवरील लाला लजपतराय कॉलेजसमोर आणि लोटस जेटीजवळ आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला.

या दुर्घटनेत कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये 21 वर्षीय शानय गज्जल, 17 वर्षीय धिर्या सेठ आणि अंदाजे 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तिसऱ्या मृत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या अपघातातील अन्य दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात सप्टेंबरअखेरीस पुन्हा पावसाचा जोर वाढणार; विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा

त्यापैकी एका 20 वर्षीय तरुणाला नायर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अतिवेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक संशय आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण काय होतं, कारचा वेग किती होता आणि दुर्घटनेपूर्वी नेमकं काय घडलं, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात आहे.

मुंबईच्या कोस्टल रोडवर पहाटे घडलेल्या या भीषण दुर्घटनेत तीन तरुणांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या अपघातामागचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

follow us