Download App

बापरे! फक्त तीस वर्षात ‘या’ आजाराचे रुग्ण दुपटीने वाढले; अहवालातून धक्कादायक माहिती

आज 80 कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेहाचा सामना करत आहेत. 2050 पर्यंत मधुमेह ग्रस्त रुग्णांची संख्या 130 कोटींपेक्षाही जास्त होईल

Diabetes News : मधुमेह हे असे एक नाव आहे जे आज अगदी कॉमन झालं आहे. प्रत्येक कुटुंबात हे नाव ऐकायला मिळतच. आधी असं समजलं जायचं हा आजार (Diabetes) फक्त वयस्कर लोकांना होतो. पण आज घडीला कुणीही या आजाराच्या विळख्यात सापडू शकतो. तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण 1990 मध्ये डायबिटीजच्या रुग्णांची संख्या फक्त 7 टक्के होती. पण 2022 पर्यंत यात दुपटीने वाढ होऊन ही संख्या 12 टक्क्यांपर्यंत पोहोचली. ही माहिती कुणा साध्या अहवालावरून घेतलेली नाही तर जग प्रसिद्ध जर्नल द लँसेट मध्ये प्रकाशित एका रिपोर्ट मधून समोर आली आहे.

आज 80 कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेहाचा सामना करत आहेत. जर अशीच स्थिती कायम राहिली तर 2050 पर्यंत मधुमेह ग्रस्त रुग्णांची संख्या 130 कोटींपेक्षाही जास्त होऊ शकते. ही आकडेवारी फक्त धक्कादायकच नाही तर एक कठोर सत्य सुद्धा आहे. यांमुळे मधुमेहाच्या बाबतीत पुन्हा एकदा गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मधुमेह रुग्ण वाढण्याचं कारण काय

एनएसडी रिस्क फॅक्टर कोलेबोरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने हा अभ्यास करण्यात आला. जो देश समृद्ध आहे तेथे या आजाराचा प्रसार कमी आहे. या अभ्यासात एक हजारांपेक्षा जास्त जुन्या संशोधनाचं विश्लेषण करण्यात आलं आहे. यामध्ये 14 कोटींपेक्षा जास्त लोकांची माहिती आहे.

सावधान! कुणालाही होऊ शकतो कॅन्सर; काळजी घ्या, ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवाच..

सन 1990 मध्ये मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या 20 कोटी होती. 2022 पर्यंत ही संख्या 83 कोटी इतकी झाली. 1980 मध्ये वयस्कर लोकांमध्ये मधुमेहाचा दर 4.7 टक्के इतका होता. यामध्ये वाढ होऊन हा दर आता 8.5 टक्के इतका झाला आहे. लोकांच्या जीवनशैलीत बदल होत असल्याने मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. या रिसर्चच्या लेखकांनी लठ्ठपणा आणि खानपानालाच टाईप 2 मधूमेहाचे मुख्य कारण सांगितले आहे.

टाईप 1 मधुमेह जो शक्यतो कमी वयात होतो आणि यापासून सुटका करून घेणे देखील खूप कठीण ठरते. कारण यामध्ये शरीरात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. ज्या देशांमध्ये सध्या वेगाने शहरीकरण होत आहे तसेच ज्या ठिकाणी लोकांच्या आहाराच्या सवयी आणि रोजच्या दिनचर्येत बदल झाले आहेत त्या देशांत ही समस्या गंभीर बनली आहे. महिलांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे.

लँसेट मधील अभ्यासानुसार 30 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 59 टक्के म्हणजेच 44.5 कोटी लोकांना 2022 मध्ये मधुमेहावर काही इलाज मिळाला नाही. आफ्रिका खंडातील देशांत तर मोठ्या कष्टाने फक्त 5 ते 10 टक्के लोकांना उपचार मिळत आहेत. मधुमेहावर औषधे उपलब्ध असताना अशी परस्थिती निर्माण झाली आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत आरोग्य व्यवस्था पुरेशा सक्षम नसल्याने लोकांना उपचार मिळण्यात अडचणी येतात.

आता तर डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड अशी नवी ओळख भारताची झाली आहे. आजमितीस भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 2023 पर्यंत देशात 10 कोटींपेक्षा जास्त मधुमेहाची प्रकरणे होती. भारताचा शेजारी देश पाकिस्तानात सुद्धा एक तृतीयांश महिला मधुमेहाने ग्रस्त आहेत. 1990 मध्ये हा आकडा 10 टक्क्यांपेक्षाही कमी होता. या देशाच्या तुलनेत विकसित देशांनी मधुमेहात स्थिरता किंवा रुग्ण कमी होण्याची स्थिती अनुभवली आहे. जपान, कॅनडा, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या देशांत मधुमेहाच्या प्रसारात कमतरता दिसून आली आहे.

कोरोनाच्या लाटेत वाढला होता ‘हा’ घातक आजार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

यावर इलाज काय

या अभ्यासातील लेखकांचं म्हणणं आहे की मधुमेहावर उपचार खर्चिक आहेत. ही एक मोठी समस्या आहे. आफ्रिकेतील देशांत औषधे आणि इन्सुलिनचा खर्च इतका जास्त आहे की चांगला उपचार तर सोडाच पण पूर्ण उपचार सुद्धा मिळत नाही. त्यामुळे या आजाराचा सामना करण्यासाठी आता एका जागतिक धोरणाची गरज निर्माण झाली आहे. स्वस्त औषधांची उपलब्धता वाढवणे, मधुमेहाबाबत जनजागृती करणे आणि निरोगी जीवनशैलीचा पुरस्कार करणे यासाठी योग्य धोरण आखण्याची गरज आहे. यामुळे मधुमेहाचा वाढता भार कमी करता येईल.

follow us