Download App

प्रशासन सज्ज! उमेदवारांची वाढली धाकधूक, नगर जिल्ह्यात अशी पार पडणार मतमोजणी

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उद्या म्हणजेच मंगळवार दि.4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने उद्या म्हणजेच मंगळवार दि.4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी होणार आहे. नगर शहरातील एमआयडीसी (MIDC) येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे.

विशेष म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्यक्षात 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सुमारे एक हजार पाचशे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. दरम्यान या सर्व प्रक्रियेवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः लक्ष ठेवून असणार आहे.

नगर शहरातील एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ या ठिकाणी मंगळवारी मतमोजणी पार पडणार आहे. त्यानुषंगाने आज म्हणजेच सोमवारी सायंकाळी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना हजार राहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे तर अधिकारी हे मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हजर राहणार आहे.

एका विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल

अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये शेवगाव -पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर,शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर व नेवासा असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत.

अशा पार पडणार मतमोजणी फेऱ्या विधानसभा मतदार संघ निहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, अहमदनगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेऱ्या, श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या तर कर्जत जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेऱ्या होणार आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेऱ्या, शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या, कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेऱ्या, श्रीरामपुर 311 मतदान केंद्र 23 फेऱ्या तर नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या होणार आहेत.

विखे-कोल्हे संघर्षाचा नवा अंक; नाशिक शिक्षक मतदारसंघात राजेंद्र विखेंचा कोल्हेंविरोधात शड्डू?

मतमोजणी केंद्रात मोबाईलला बंदी

मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे मीडिया प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.

follow us