मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिले आहेत. नार्वेकर यांनी सादर केलेले वेळापत्रक आतापर्यंत दोनवेळा फेटाळून लावत न्यायालयाने त्यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना आणखी वेळ वाढवून देण्यास नकार देत आता न्यायालयानेच मुदत दिली आहे. नार्वेकरांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Assembly Speaker Rahul Narvekar is likely to resign before the winter session)
दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे नार्वेकर व्यतित झाले असून ते येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामागे भाजपची राजकीय खेळी असल्याचेही बोलले जात आहे.
सुनावणीदरम्यान, आमदार अपात्रतेवरील सुनावणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, होणारा विलंब हा याचिका अप्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदविले. ते म्हणाले, जर विधानसभा अध्यक्ष कालबद्ध पद्धतीने या याचिकांवर सुनावणी करू शकत नसतील तर न्यायालयावर सुनावणी घेण्याची वेळ आली आहे असे दिसते. त्यामुळे या प्रकरणात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिले.
यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेळ वाढवून देण्याची मागणी वकिलांनी केली. मात्र तीही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण नार्वेकर यांच्या कार्यक्षमेतवर आणि निष्पक्षपातीपणावर ठपका असल्याचे मत संविधान तज्ज्ञ नोंदवत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यतित झालेले नार्वेकर हिवाळी अधिवेशनापूर्वीच राजीनामा देण्याचा मानसिकतेत असल्याचे सांगितले जात आहे.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला परिस्थितीनुसार निर्णय घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र होतील, असे बोलले जातील. त्यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय भाजपलाही हा निर्णय डोकेदुखीचा ठरु शकतो. कारण मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र झाल्यास सर्वांचे पुनर्वसन कसे करायचे? हा मोठा प्रश्न असणार आहे. सोबतच राहुल नार्वेकर यांनीच राजीनामा दिल्यास नवीन येणाऱ्या अध्यक्षांना सुनावणीची प्रक्रिया नव्याने राबवावी लागेल, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा वेळ वाढवून घेणे आणि निर्णय लांबणीवर टाकणे हे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे, असेही सांगितले जात आहे.
राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागी कोण? याबाबत चाचपणी सुरु असल्याचे बोलले जाते. कारण उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याच विरोधात सध्या अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे संविधानिक नियमानुसार त्यांच्याकडे सुनावणीसाठी हे प्रकरण येणार नाही. अशावेळी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते. किंवा भाजप आपल्याच पक्षातील दुसऱ्या आमदाराची अध्यक्ष म्हणून नेमणूक करेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.