Shivajirao Kardile : जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले; राजकीय क्षेत्रातून कर्डिलेंना श्रद्धांजली

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Mla Shivajirao Kardile) यांचे आज (दि.17) पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

Shivajirao Kardile : जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले; राजकीय क्षेत्रातून कर्डिलेंना श्रद्धांजली

Shivajirao Kardile : जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले; राजकीय क्षेत्रातून कर्डिलेंना श्रद्धांजली

Political Leader Condolences On MLA Shivajirao Kardile Death : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Mla Shivajirao Kardile) यांचे आज (दि.17) पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. कर्डिले यांच्या निधनानंतर राजकीय स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपल्याच्या भावना व्यक्त करत कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात

राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे.

तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला – अजित पवार

राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली.

जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून ओळख – वडेट्टीवार

शिवाजीराव कर्डिले यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष सभागृहात काम केलं, जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती, त्यांना माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. तर, कर्डिले यांच्या निधनाने मला धक्का बसला. ते एक पैलवान होते माझ्यासोबत मंत्री मंडळात होते. त्याचं असं अचानक जाण अनपेक्षित आहे. नियतीच्या मनात काय असतं सांगता येत नाही असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व अहिल्यानगर जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी काही काळ मंत्री म्हणून देखील काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे कर्डिले कुटुंबावर कोसळलेल्या अपार दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तर, राहुरी मतदारसंघाचे भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आज आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्राने एक सेवाभावी नेतृत्व गमावले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी दिलेली सेवा तसेच समाजाभिमुख कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. अशा भावना व्यक्त करत भाजप नेते नितेश राणे यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

कार्यकर्त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक नेता आपण गमावला – राधाकृष्ण पाटील

शिवाजीराव कर्डीले शुक्रवारी पंडित प्रदिपकुमार मिश्रा यांच्‍या दर्शनासाठी माझ्या लोणी येथील निवासस्‍थानी आले होते.ए‍कत्रित आम्‍ही जेवणही केले. अतिशय मनमोकळ्या गप्‍पाही मारल्‍या. परंतू अचानक असे वृत्‍त येणे याचे मनस्‍वी दु:ख व्‍यक्तिगत मला झाले आहे. तब्‍बल २५ वर्षांची त्‍यांची आणि माझी मैत्री राहीली, कधी मतभेदही झाले. परंतू मनामध्‍ये कटूता नव्‍हती. लोकांसाठी समर्पित भावनेने काम करणारं व्‍यक्तिमत्‍व त्‍यांच्‍यामध्‍ये पाहायला मिळालं. कर्डिले यांच्या निधनानं अहिल्‍यानगरच्‍या राजकारणाची मोठी हानी झाली असून, कार्यकर्त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक नेता गमावल्याचे मोठे दु:ख आहे, अशा भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिले यांच्या निधनावर बोलताना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version