BJP-RPI alliance releases manifesto in Pune, putting women at the center : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात दाखल झाल्या असून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. अशा वातावरणात प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप-आरपीआय महायुतीने महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत निवडणूक प्रचारात लक्षवेधी पाऊल उचलले आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप–आरपीआय महायुतीचे उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव आणि रामदास दत्तात्रय दाभाडे यांनी संयुक्तपणे हा महिला जाहीरनामा जाहीर केला. महिला आरोग्य, महिला सुरक्षा, महिला कौशल्य विकास आणि महिला आर्थिक सक्षमीकरण या चार प्रमुख स्तंभांवर आधारित असलेला हा जाहीरनामा विशेषतः लोहगाव आणि वाघोली परिसरातील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
उमेदवारांनी सांगितले की, हा जाहीरनामा केवळ कागदापुरता मर्यादित राहणार नाही, तर निवडून आल्यानंतर वाघोली आणि लोहगाव परिसरातील घरोघरी जाऊन योजनांची अंमलबजावणी केली जाईल. महिलांच्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण तसेच आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
महिला आरोग्याच्या दृष्टीने दरवर्षी महिलांसाठी मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोगाबाबत नियमित जनजागृती व तपासणी शिबिरे तसेच प्रतिबंधात्मक उपचारांवर भर दिला जाणार आहे. महिला सुरक्षेसाठी संत जनाई बस सुविधा दर दहा मिनिटांनी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासोबतच सर्व गल्ल्या व अंधाऱ्या ठिकाणी कार्यरत पथदिवे, 24 तास महिला आपत्कालीन हेल्पलाईन, तात्काळ अॅम्ब्युलन्स सेवा आणि महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित व अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महिला कौशल्य विकासासाठी ‘संत मुक्ताई नॉलेज सेंटर’च्या माध्यमातून महिला गृहउद्योगांसाठी कौशल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन, इंग्लिश स्पीकिंग व कम्युनिकेशन कोर्स, पदवीधर महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन, महिलांसाठी एआय प्रशिक्षण कार्यक्रम तसेच महिला-केंद्रित सुरक्षित को-वर्किंग स्पेस उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी 10 महिला क्रीडापटूंना विशेष शिष्यवृत्ती, 10 नाविन्यपूर्ण महिला गृहउद्योगांना आर्थिक सहाय्य, दहावी–बारावीनंतर विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शनासह शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुली व महिलांसाठी शैक्षणिक आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरुवातीपासूनच भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी “नगरसेवक म्हणून नव्हे, तर प्रभागाची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणार” अशी भूमिका मांडली आहे. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘100 दिवस 100 कामे’ या संकल्पनेचा संदर्भ देत, निवडून आल्यानंतर 100 दिवसांत 100 विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
पूर्व पुण्यातील येरवडा, वाघोली, लोहगाव, चंदननगर आणि खराडी परिसर झपाट्याने विकसित होत असून, या विकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि त्यांना सक्षम करणे, हाच या महिला जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले आहे. महिलांवर केंद्रित या विशेष जाहीरनाम्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक अधिकच चुरशीची झाली असून, आता अंतिम निर्णय मतदारांच्या हातात आहे.
