Download App

शिवछत्रपतींच्या ‘वाघनखांना’ मुहूर्त सापडेना… ‘नोव्हेंबर अन् जानेवारीचं आश्वासन हवेतच!

मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी आता ‘मे’ महिन्यापर्यंतची वाट पहावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे हा विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला होता. यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

यानंतर 15 एप्रिल 2023 रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून राज्य शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी सप्टेंबर 2023 मध्ये व्हिटोरिया अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाशी सामंजस्य करार केला होता.

वाघनखे कायमचे आम्हाला द्या; महाराष्ट्रातील दोन वाघ तुम्हाला देतो : शिंदे सरकारचा ब्रिटनला प्रस्ताव

नोव्हेंबर 2023 पासून तीन वर्षे ही वाघनखे भारतात राहतील, असे त्यात म्हटले होते. त्यानंतर 16 नोव्हेंबरला वाघनखे मुंबईत येणार असल्याचे आणि सातारा, कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय आणि मुंबईतील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येतील असे सांगण्यात आले होते.

नोव्हेंबर संपल्यानंतरही वाघनखे न आल्याने प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यानंतर जानेवारीमध्ये ही वाघनखे भारतात येतील असे सांगितले गेले. पण आता जानेवारीतही ही वाघनखे येणार नाहीत. ही वाघनखे आणण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याची गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली असून सध्या हे प्रकरण परराष्ट्र खात्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. वस्तुसंग्रहालयाकडूनही ब्रिटिश सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकार व ब्रिटिश सरकारच्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर मे अखेरीपर्यंत ती मुंबईत येतील, असे लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, जगदंब तलवार लवकरच भारतात येणार

सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?, काँग्रेसचा खोचक सवाल 

जानेवारीतही वाघनखे येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने खोचक सवाल विचारला आहे. नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार यांनी एक ट्विट केले. नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली. थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने आले होते, अशी टीका वडेट्टीवार यांनी या ट्विटद्वारे केली.

follow us