Download App

बॅंक फसवणूक प्रकरणी धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक

कथित बँक फसवणूक प्रकरणात डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे.

Image Credit: letsupp

Dheeraj Wadhawan Arrested By CBI : कथित बँक फसवणूक प्रकरणात डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे. वाधवान यांच्यावर 34 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्या आरोपात त्यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना दिल्ली विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. (DHFL Scam) यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

आरोपपत्र दाखल

काल सायंकाळी धीरज वाधवान यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याप्रकरणी सीबीआयने 2022 मध्येच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या ते जामीनावर बाहेर होते.

 

कर्ज सुविधा दिल्याचा आरोप

सीबीआयने 2022 मध्ये एकूण 17 बँकांची 34 हजार कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी 2010 ते 2018 दरम्यान डीएचएफएलला 42 हजार 781 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी मिळून हेराफेरी केली आणि मे 2019 पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून 34 हजार 615 कोटी रुपयांची फसवणूक केली, असं सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगण्यात आले होते.

follow us

वेब स्टोरीज