प्रज्वल रेवन्नाची सीबीआय चौकशीची भाजपची मागणी, एसआयटीवर जादूटोणा केल्याचा आरोप
Revanna sex tape case : कर्नाटकातील विरोधी भाजपच्या नेत्यांनी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची आणि संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. एसआयटीकडून चौकशीत सत्य बाहेर येणार नाही. त्यावर जादूटोणा केल्याचा आरोप कर्नाटक भाजपकडून करण्यात आला आहे.
राजकीय घमासान
33 वर्षीय जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत, त्यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-जेडी(एस) यांच्यात राजकीय घमासान सुरू आहे. काँग्रेस सरकारने या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं असताना, भाजप आणि जेडी(एस) – एनडीए भागीदारांनी – ते सीबीआयकडे सोपवण्याची आणि या प्रकरणामागील लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महिला आयोगाकडे तक्रार
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, दोषींना या प्रकरणातून बाहेर काढणं आणि शिक्षा सुनिश्चित करणं हे एसआयटीचे प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु, ते होत नाही असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, चौकशी कोणत्या मार्गाने सुरू आहे यावर लोक शंका घेत आहेत. महिलांना राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यास भाग पाडलं जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
आम्ही त्यांच्या लढ्यात त्यांना पाठिंबा देणार
या प्रकरणात कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक म्हणाले, भाजपची स्पष्ट भूमिका आहे की, आमचा भाजप पक्ष त्यांच्या युतीतील भागीदार JD(S) आहे. आम्ही त्यांच्या लढ्यात त्यांना पाठिंबा देणार आहोत. तसंच, या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे तर सत्य बाहेर येईल असंही आर अशोक म्हणाले आहेत.