Download App

जळगाव हादरले… मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पित्याने मुलीला संपविले, जावई गंभीर

गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केलं.

  • Written By: Last Updated:

Jalgaon Crime News : प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार करत मुलीला ठार केलंय, तर जावयाला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा शहरात ही खळबळजनक घटना उडाली आहे. या ऑनर किलिंग घटनेत संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम (Crime) मारहाण केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेत सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या एका कार्यक्रमात बेछूट गोळीबार केलाय. या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

सामूहिक विवाह सोहळ्याचा आनंद जीवावर बेतला; जेवणातून ६०० जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. आज चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघं आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत त्यांनी आपल्या जवळील बंदुकीने गोळ्या झाडल्या. गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केलं. सध्या जखमींची प्रकृती गंभीर असून जावई अविनाश वाघ यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

follow us