सामूहिक विवाह सोहळ्याचा आनंद जीवावर बेतला; जेवणातून ६०० जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

Food Poisoning in Sambhajinagar District : छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड तालुक्यामधील अंबाळा ठाकूरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्याच्या जेवणातून जवळपास 600 जणांना विषबाधा झाल्याची (Poisoning ) धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली. विषबाधेचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
Parenting Tips : मुलांना जेवू घालताना यागोष्टी टाळाच; मुले राहतील फ्रेश अन् हेल्दी
अंबाडा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये अंबाळासह महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर आणि इतर 32 ठाकरवाड्यातील वऱ्हाडी आले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर या सर्वांनी जेवण केले. घरी परतले दुसऱ्या दिवशी या सर्वांनाच उलटी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली.
सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या बालकाचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. तसेच संगीता मेंगाळ (वय २५, रा. अंबाला) या महिलेसह 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही रुग्णांवर करंजखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अंबाला गावामध्ये आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा शुक्रवार दुपारी 4.30 वाजता झाला. या सोहळ्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. त्यात परिसरातील 32 ठाकरवाड्यांमधील आलेल्या पाहुण्यांनी जेवण केले. त्यातील अनेकांना 26 एप्रिल रोजी विषबाधेचे लक्षणे दिसू लागली. उलट्या, जुलाब, पोटदुखी होऊ लागली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले.
अधिकाऱ्यांची धाव
सामूहिक लग्न सोहळ्यातून विषबाधा झाल्याची घटना समजताच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर घटनास्थळी पोहचले. तसेच उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, विषबाधेचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेण्यात येणार आहे.