पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्याची प्रसिद्ध जोडी. मागील दोन ते अडीच दशकांपासून या जोडीने राज्याचं संपूर्ण राजकारण त्यांच्याभोवती फिरत ठेवलं आहे. मात्र अलिकडेच झालेल्या बंडानंतर या काका-पुतण्यांचे संबंध काहीसे ताणले गेले आहेत. मात्र आजही कुटुंब म्हणून पवार घराण्यातील जिव्हाळा सातत्याने दिसून येतो. (How was Ajit Pawar’s relationship with other uncles except Sharad Pawar)
तसं तर अजित पवार यांना एकूण 6 काका. त्यापैकी अनेकांना शरद पवार यांच्याविषयीच माहिती आहे. अशात अजित पवार यांचे शरद पवार सोडून इतर काकांशी कसे संबंध होते, याबाबत त्यांनी स्वतः उत्तर दिलं आहे. आज वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी अजित पवार यांची सविस्तर राजकीय विषय सोडून मुलाखत घेतली. यात त्यांनी या गोष्टीबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे.
गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण 11 अपत्य. त्यापैकी 7 मुलं आणि 4 मुली. यात अनुक्रमे वसंतराव पवार, दिनकरराव पवार, अनंतराव पवार, माधवराव पवार, सुर्यकांत पवार, शरद पवार, प्रताप पवार अशी नाव आहेत. यातील अनंतराव पवार हे अजित पवार यांचे वडील. तर शरद पवार हे राजकारणात आले. बाकीच्या 5 काकांबद्दल अजित पवार यांनी या मुलाखतीत सविस्तर सांगितलं आहे.
आम्ही सगळे लहान होतो, शाळेत जात होतो तेव्हाच आमचे सगळ्यात थोरले काका वारले. आप्पासाहेब काका बाहेर होते, बापुसाहेब काका बाहेर होते, बाळ काका बाहेर होते, प्रताप काका शिकायला बाहेर होते. आत्या कधीतरी सुट्टीला यायची. त्यामुळे या सगळ्यांशी आमचा जास्त संबंध आला नाही. पवार साहेबांचा मात्र 1967 ला बारामतीला आमदार झाले, 1962 त्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच राजकीय जीवनाला सुरुवात केली. घराणे पूर्णतः शेतकरी कामगार पक्षाचे. आबा, बाई आणि त्यांची सगळी मुले शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे. पवार साहेब मात्र एकटचे काँग्रेसच्या विचारांचे होते.
या सगळ्यामुळे आमचा जो काही संबंध आला तो पवार साहेबांशीच आला.कारण ते बारामतीला यायचे. तिथं ते आले की हाफ पॅन्टवर लोकांना चहा वगैरे द्यायचो. साहेबांशी संबंध आला तरी मी त्यांना घाबरुनच असायचो. इतर काकांबद्दलही असचं काही असायचं. त्यांची आम्हाला आदरयुक्त भीती असायची. आम्ही कधी त्यांच्यापुढे गेलो नाही. आमच्या घरातील मुली मात्र त्यांच्यासोबत जाणं, जवळ बसणं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या. मुलं मात्र लांबच असायचे. पण आम्हाला पहिल्यापासून सख्ख आणि चुलत यातील फरक कधीच जाणवू दिला नाही. त्यामुळे आम्ही भावंडं सगळे गुण्या-गोविंदाने राहिलो, असं अजित पवार यांनी सांगितलं.