Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) यांच्यासह जालना जिल्ह्यातील नऊ जणांविरोधात प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला कितीही एकटा पाडायचा प्रयत्न करा, मी आता थांबत नसतो. मी आरक्षण मागतो, म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का? असा सवाल जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.
माहितीनुसार, अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर विलास खेडकर यांच्यासह जालना जिल्ह्यातील नऊ जणांविरोधात शनिवारी रात्री तडीपारीची कारवाई करण्यात आली. यानंतर या प्रकरणात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मी पाहुणारावळा मानत नाही, पूर्ण राज्य माझा पाहुणा आहे. मराठा आंदोलकांना नोटीसा द्यायच्या, पाहुणेरावळ्यांच्या नावाखाली माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. मी आरक्षण मागतो म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का? फडणवीस साहेब, तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही, असा घणाघात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी केला.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीसांनी करावे, अशी आमची इच्छा होती. बेईमानी आणि गद्दारी या शब्दांचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका. आम्ही भोळे लोक आहोत, तुम्हाला सढळ हाताने मदत केली आहे. तुम्ही रंडकुंडीला आला होता, ही गादी कधीच मिळू शकत नव्हती.
धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा का नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का? अंजली दमानियांचा सवाल
या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुमचे भागले म्हणून तु्म्ही उलटणार असला, तर हे तुमच्यासाठी घातक ठरेल. असा इशारा देखील यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.