मुंबई : विधानसभेच्या 288 जागांसाठी काल (दि.20) मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या सर्व धामधुमित अॅक्सिस माय इंडियाचा पोल समोर आला नव्हता. परंतु, आता ॲक्सिस माय इंडियानेदेखील त्यांचा पोल जाहीर केला असून, राज्यातील बहुसंख्य मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असे सांगण्यात आले आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला राज्यात 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, वंचित बहुजन आघाडीला शून्य तर, अन्य पक्षांना 6 ते 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Assembly Election Axis My India Exit Poll)
विभागनिहाय ॲक्सिस इंडियाचा पोल काय?
पश्चिम महाराष्ट्र : महायुती 36, महाविकास आघाडी 21 अन्य 1
उत्तर महाराष्ट्र : महायुती 38, महाविकास आघाडी 7 अन्य 2
मराठवाडा : महायुती 30, महाविकास आघाडी 15, अन्य 1
कोकण-ठाणे : महायुती 24, महाविकास आघाडी 13, अन्य 2
मुंबई : महायुती 22, महाविकास आघाडी 14,अन्य 0
विदर्भ : महायुती 49, महाविकास आघाडी 20, अन्य 3
भाजप सर्वात मोठा पक्ष; अन्य एक्झिट पोलचे अंदाज काय?
ॲक्सिस माय इंडियाशिवाय अन्य प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल काल (दि.20) समोर आले होते. ज्यात मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पीपल्स पल्सचा अंदाजानुसार महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज असून, महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय अन्य पक्ष आणि अपक्षांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मेघ अपडेट्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील असा मेघ अपडेट्सचा अंदाज आहे. अपक्ष आणि अन्य पक्षांना आठ ते दहा जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोल डायरीने निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थानापन्न होण्याची शक्यता आहे. महायुती 122 ते 186 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीला 121 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रिपब्लिकनेही राज्यातील निवडणुकीत महायुतीला कौल दिला आहे. या अंदाजानुसार महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
हरियाणा अन् लोकसभा निवडणुकीतील अंदाज होते चुकले
यापूर्वी म्हणजेच नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ॲक्सिस माय इंडियाने 50 हून अधिक जागा जिंकून काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला होता. तर, लोकसभेला 2019 पेक्षा केंद्रात फक्त भाजपला 2024 लोकसभा निवडणुकीत 350 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, लोकसभे पाठोपाठ नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेतील ॲक्सिस माय इंडियाचे अंदाज चुकले होते. त्यामुळे आता राज्यातील विधानसभेच्या मतदानानंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळेल हा अंदाज कितपत अचूक ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.