HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात यंदा तब्बल ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळीही मुलीच हुशार ठरल्या आहेत. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बारावी परीक्षा निकालाची माहिती दिली. या परीक्षेत एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थी बसले होते. यापैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.४४ टक्के इतकी राहिली आहे.
या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर, कोकण, नाशिक आणि लातूर या नऊ मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! उद्या बारावी बोर्डाचा निकाल; वाचा, निकाल कसा पाहायचा
खासगी विद्यार्थी म्हणून एकूण ४१ हजार ३६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ३४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ टक्के इतकी राहिली आहे. नऊ मंडळांमधून ७ हजार ३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण ६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९४.२० टक्के आहे.
सर्व विभागीय मंडळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.५१ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९१.९५ टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाच्या निकालाची टक्केवारी ९४.४४ टक्के, नागपूर ९२.१२ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के, मुंबई ९१.९५ टक्के, कोल्हापूर ९४.२४ टक्के, अमरावती ९३ टक्के, नाशिक ९४.७१ टक्के, लातूर ९२.३६ टक्के आणि कोकण विभागाचा निकाल ९७.५१ टक्के इतका राहिला आहे.
पोस्ट विभागात 1899 पदांसाठी मेगा भरती, बारावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज, 81 हजार रुपये पगार
बारावीच्या परीक्षेत यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळात मुलींच्या परीक्षेचा निकाल ९५.४४ टक्के इतका राहिला आहे. तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के इतका राहिला आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांच्या तुलनेत ३.८४ टक्के जास्त राहिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केली.