BRS News : तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात वेगाने विस्तारत चालला आहे. काल खुद्द तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) अख्ख्या मंत्रिमंडळाला घेऊन पंढरपुरात आले होते. येथे त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भगिरथ भालके यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला. फक्त भालकेच नाही तर संपूर्ण राज्यात अनेक शिलेदार या पक्षाला मिळाले आहेत. दिवसेंदिवस पक्षाची राजकीय ताकद वाढत असल्याने आगामी निवडणुकांत बीआरएस (BRS) कुणाला धक्का देणार?, कुणाची मते खाणार?, कोणत्या पक्षाला जास्त फटका बसणार? याची गणिते मांडली जाऊ लागली आहेत.
या संदर्भात लेट्सअप मराठीनेही एक ऑनलाइन पोल घेतला होता. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचा कोणाला फटका बसेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नावर जवळपास 61 हजार नागरिकांनी उत्तरे दिली आहेत.
बीआरएस पक्ष महाराष्ट्रात आल्याने भाजप-शिवसेनेला फटका बसेल असे मत 44 टक्के लोकांनी नोंदवले आहे. तर बीआरएसचा महाविकास आघाडीला फटका बसेल असे 56 टक्के लोकांना वाटत आहे. म्हणजे भाजप शिवसेनेच्या तुलनेत बीआरएस महाविकास आघाडीचेच जास्त नुकसान करणार असे यातून स्पष्ट होत आहे. भाजप-सेना युतीलाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या बीआरएसची जोरदार चर्चा सुरू आहे. बीआरएसही भाजपाची बी टीम आहे. महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी मतविभागणी करण्यासाठी भाजपनेच त्यांना महाराष्ट्रात बोलावल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. याआधी हैदराबादमधून एमआयएम आला होता त्यानंतर आता हा दुसरा पक्ष राज्यात आला आहे. त्यामुळे राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!
अबकी बार किसान सरकार या टॅगलाइनचे बॅनर अगदी गावखेड्यांतही दिसत आहेत. पक्षाने सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसलाच दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवर पक्षाचे नेते बोलतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांनीही केसीआर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जर केसीआर यांचा पक्ष राज्यात आणखी बळकट झाला. पक्षाने जर आगामी निवडणुकीत अनेक मतदारसंघात उमेदवार दिले तर मतविभागणी निश्चित मानली जात आहे. त्याचा फटका कोणाला बसेल याचा अंदाज लोकांनी व्यक्त केला आहेच.