Download App

गोळीबारानंतर भाजप आमदाराचे शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, तोपर्यंत गुन्हेगारच पैदा होणार

Ganpat Gaikwad Firing : ‘माझ्या मुलाला जर पोलिसांसमोरच गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर एक बाप म्हणून मी कदापि सहन करणार नाही. महेश गायकवाडने जबरदस्तीने माझ्या जागेवर कब्जा केला होता. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली आता ते भाजपबरोपबरही तेच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो रुपये बाकी आहेत. ते जर देवाला मानत असतील तर शपथ घेऊन सांगावं की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत? एकनाथ शिंदेच जर मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील’, असे गंभीर आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केले.

शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना आता अटक झाली आहे. या घटनेनंतर झी 24 तास वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), त्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.

मनस्ताप झाला म्हणून फायरिंग केली 

पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना आज एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवलं. याचा मला मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केली. मला या गोष्टीचा काहीच पश्चाताप नाही कारण जर पोलिसांसमोर माझ्या मुलाला मारहाण होत असेल तर मी काय करणार?

कल्याण : CM शिंदेंच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; भाजप आमदार गणपत गायकवाडांचे पोलिसांसमोरच कृत्य

मी माझ्या वरिष्ठांनाही या लोकांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. माझ्या वाट्याचा निधी परस्पर वापरला जात होता. श्रीकांत शिंदे येथे स्वतःचे फलक लावत होते. ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचे फलक लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेंनी भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले हे शिंदे साहेबांनी सांगावं, असे गायकवाड म्हणाले.

दोघांतील वाद काय होता ?

गायकवाड म्हणाले, मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्या जागामालकाला दोन ते तीन वेळा पैसेही दिले होते. तरी देखील सह्या करण्यासाठी ते येत नव्हते. मग आम्ही न्यायालयात गेलो तेथे हा खटला जिंकला. केस जिंकल्यानंतर जागेचा सातबारा आमच्या कंपनीच्या नावावर झाला. त्यावेळी महेश गायकवाड यांनी जबरदस्तीन त्या जागेवर कब्जा केला. या जागेचा जबरदस्तीने ताबा घेऊ नका अशी विनंती मी त्यांना दोन दिवसांपूर्वी केली होती. परंतु, त्यांनी दादागिरी केली. कंपाउंड तोडून आत घुसले. तसेच पोलीस स्टेशनसमोर चारशे ते पाचशे लोक घेऊन तो आला होता.

माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता त्यावेळी माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही. या गोष्टीचा मला पश्चाताप नाही. मी व्यावसायिक माणूस आहे. पण माझ्या मुलांना जर कुणी गुन्हेगार मारत असतील तर माझ्या जगण्यात अर्थ नाही. माझ्या मुलाला जर कुणी मारत असेल तर एक बाप म्हणून मी हे कदापि सहन करू शकणार नाही.

‘इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?’ ‘गोळीबारा’च्या घटनेवर वडेट्टीवारांचा संताप

एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या 

शिंदे साहेबांनी भाजपबरोबर गद्दारी केली आणि आता ते भाजपाबरोबर सुद्धा गद्दारी करणार आहेत. माझ्यासोबत सुद्धा गद्दारी केली. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो रुपये बाकी आहेत. शिंदे साहेब जर देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊन सांगावं की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत. एवढे पैसे खाऊन सुद्धा ते गणपत गायकवाडच्याच विरुद्ध काम करत आहेत. पुढे कोर्टाचा जो काही निर्णय होईल तो मला मान्य राहिल. महाराष्ट्रातील ही अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे असे माझे मत आहे.

नेमकं काय घडलं ? 

उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हिल लाईन पोलिसांनी काल दोघांनाही बोलावलं होतं. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सु्मारास दोघांतील वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील सुद्धा जखमी झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या.

follow us