कल्याण : CM शिंदेंच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; भाजप आमदार गणपत गायकवाडांचे पोलिसांसमोरच कृत्य
कल्याण : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला आहे. काही वृत्तांनुसार भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी स्वतः तर काही वृत्तांनुसार त्यांच्या अंगरक्षकाने उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केला आहे. या घटनेत महेश गायकवाड यांना दोन तर त्यांच्या मित्राला दोन गोळ्या लागल्या असून दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (BJP MLA Ganpat Gaikwad fired at Shiv Sena’s Kalyan city chief Mahesh Gaikwad)
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार गायकवाड यांच्या मुलामध्ये आणि महेश गायकवाड या दोघांमध्ये 50 गुंठे जमिनीचा वाद सुरु होता. या वादाबाबत आज उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात बैठक सुरु होती. यावेळी आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील हा वाद मिटण्याऐवजी जोरदार खडाजंगी झाली. काही वेळातच हा वाद इतका वाढला की महेश गायकवाड यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या समोरच गोळ्या झाडल्या. मात्र हा गोळीबार स्वतः आमदार गायकवाड यांनी केला की त्यांच्या अंगरक्षकाने हे गूढ कायम आहे.
Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिला लोकसभेच्या ‘या’ जागांचा प्रस्ताव
या घटनेत दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन त्यांचे मित्र राहुल पाटील यांना लागल्या आहेत. दोघांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र या घटनेनंतर पोलीस स्टेशन बाहेर आणि रुग्णालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे दोन्ही परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. दरम्यान, अद्याप आमदार गायकवाड, त्यांचा मुलगा आणि अंगरक्षकावर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.